esakal | वेड 'लावले' प्रेमाचे...
sakal

बोलून बातमी शोधा

Love

वेड 'लावले' प्रेमाचे...

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - ‘ती’ आणि ‘तो’ एकाच वस्तीत राहणारे. ती अल्पवयीन, तर तो सज्ञान. घरेही तशी एकमेकांच्या जवळच. लॉकडाउनमध्ये (Lockdown) दोघांची मने जुळली. (Love) पुढे एखाद्या चित्रपटाप्रमाणे ते दोघेही घरातून पळून गेले. अजाणत्या वयातच हा प्रकार घडल्याने तिकडे दोघांचीही जगण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू झाली, इकडे गुन्हा (Crime) दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही (Police) मुलाला अटक करून मुलीला पालकांकडे सोपविले. अशा पद्धतीने अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल दोन हजार अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत! (Love Cheating Minor Girls Crime Pune)

सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. विश्रामबाग पोलिसांनी त्याचा शोध घेऊन मुलाला अटकही केली. या घटनेनंतर काही दिवसांतच शहराच्या वेगवेगळ्या भागात पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये १४ ते १७ या वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची चिंताजनक बाब आहे.

हेही वाचा: सीमावर्ती भागातील दंगलीत गोळीबारात पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी

अल्पवयीन मुलींबाबतच्या घटनांमध्ये न्यायालयही कडक भूमिका घेत आहे. पोलिसही अशा घटनांमध्ये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करण्यावर भर देतात. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये मुलींनी पाहिलेले स्वप्न आणि प्रत्यक्षात आलेला अनुभव, यामुळे मुलींचा होणारा अपेक्षाभंग, नातेवाईक, शेजारी, समाजाकडून होणारा अपमान, टीका आणि भविष्याची चिंता, या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर होतो. त्याचबरोबर पालकांनाही नाहक त्रास सहन करण्याची वेळ येते.

दाखल झालेले गुन्हे

वर्ष संख्या

२०१७ ४४६

२०१८ ४६१

२०१९ ३११

२०२० ३३८

२०२१ २३७

(मे पर्यंत)

कारणे...

  • पालकांचे मुलांकडे होणारे कमालीचे दुर्लक्ष

  • कुटुंबात कमी होणारा संवाद, घरातील बदललेले वातावरण

  • मोबाईल, इंटरनेट, चित्रपटांमुळे निर्माण होणारे प्रेमाचे सुप्त आकर्षण

  • आजूबाजूचे वातावरण, भाईगिरी, चैनीचे जगणे

  • आधुनिकीकरण आले, जनजागृती नाही

मुले लवकर वयात येऊ लागल्याने त्यांच्या मानसिकतेतही बदल घडत आहे. समाजमाध्यमे, घरातील वातावरणामुळे त्यास खतपाणी मिळत असल्याने प्रेमात घर सोडण्याच्या घटना घडत आहेत. भविष्याची जाण नसल्याने त्यांना परिस्थितीचे भानही राहत नाही. नंतर भांडणे होऊन त्यांच्यापुढे आई-वडीलांशिवाय पर्याय नसतो. या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्याचे वास्तव आहे.

- ॲड. सुप्रिया कोठारी, संचालक, भगिनी हेल्पलाइन

तरुणी किंवा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला जातो. त्याचबरोबर स्थानिक पोलिस ठाणे व सामाजिक सुरक्षा विभागाकडील पथकाकडून मुलींचा शोध घेऊन आरोपीस अटक केली जाते. मुलीला तिच्या पालकांकडे पाठविले जाते. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

loading image
go to top