अभिमानास्पद ! पुण्यात सर्वांत स्वस्त सिल्वर नॅनोवायरची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

  • पुण्यातील "एनसीएल'च्या संशोधकांना यश; डॉ.मांडेंच्या हस्ते पायलट प्रोजेक्‍टचे उद्घाटन 

पुणे : मोबाईलची टच स्क्रीन, सुवाहक शाई, थर्मल कोटिंग यांसारख्या इलेक्‍ट्रिकल्सच्या वापरातील सिल्वर नॅनोवायरची निर्मिती, जगात सर्वांत कमी किमतीत करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील गटाने ही कामगिरी बजावली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते पायलट प्रोजेक्‍टचे आज उद्घाटन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरामध्ये विविध वापरासाठी कंपन्यांमध्ये एकगठ्ठा (बॅच) पद्धतीने सिल्वर नॅनोवायरची निर्मिती केली जाते. पहिल्यांदाच अविरत (कंटीन्यूअस) पद्धतीने उत्कृष्ट दर्जाच्या सिल्वर नॅनोवायर डॉ. कुलकर्णी यांच्या गटाने केली आहे. बाजारात एक ग्रॅम सिल्वर नॅनो वायरची किंमत सुमारे 250 ते 600 अमेरिकन डॉलर आहे. एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी बनविलेल्या सिल्वर नॅनोवायरची किंमत फक्त 20 अमेरिकन डॉलर इतकी आहे. दिवसाला अर्धा किलो नॅनोवायरची निर्मिती या पायलट प्रोजेक्‍ट मधून करण्यात येत आहे. संशोधक विद्यार्थी प्राची काटे आणि सुनेहा पाटील यांसह डॉ. बी.एल.व्ही. प्रसाद आणि डॉ. नंदिनी देवी यांची संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी​

पायलट प्लांटची वैशिष्ट्ये 
- तब्बल बारा पटींनी स्वस्त सिल्वर नॅनोवायरची निर्मिती 
- 20 ते 60 नॅनोमीटर आकाराच्या वायर उपलब्ध 
- एका आकाराच्या जाडीच्या आणि एकसमान भौतिक गुणधर्म दाखविणाऱ्या वायरची निर्मिती 
- अविरत प्रक्रियेमुळे कच्च्या मालाचा अपव्यय नाही 
- 99.9 टक्के शुद्धता, उत्पादनाचा सर्वाधिक वेग 

"विद्युत रसायनां'च्या बाजारपेठेत भारताचा प्रवेश 
- देशात मेटल आणि मेटल ऑक्‍साईड नॅनोवायर उत्पादनाचा अभाव 
- ही उत्पादने जापान, अमेरिका, चीन आदि देशांतून आयात केली जातात 
- 2018 साली जगाला 5 टन सिल्वर नॅनोवायरची गरज भासली, 2025 पर्यंत हीच गरज 11 टनांपर्यंत जाणार 
- विद्युत रसायनांच्या उत्पादनात उद्योजकांना संधी 

सिल्वर नॅनोवायरची वैशिष्ट्ये आणि उपयोग 
- प्रिंटेड आणि लवचिक (फ्लेग्झीबल) इलेक्‍ट्रॉनिक्‍ससाठी सर्वोत्तम 
- मल्टी टच स्क्रीनसाठी मेटल मॅश तंत्रज्ञानात वापर 
- फिल्टर, ऑप्टिकल कांपोनंन्ट्‌स, प्रिंटेबल इलेक्‍ट्रॉनिक सर्किट आदि 
- वैद्यकीय क्षेत्रात दातांच्या उपचारासाठी 

सर्वात स्वस्त सिल्वर नॅनोवायरची प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती करण्यात एनसीएलच्या संशोधकांचे यश उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण आहे. उद्योगांनी अशा संशोधनाचा प्रत्यक्ष फायदा लोकांपर्यंत पोचविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. - डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Low cost Production of Silver Nanowires in Pune