सबहेड शास्त्रज्ञ, कम्युनिस्ट विचारवंत परमेश्वरन यांचे निधन

सबहेड
शास्त्रज्ञ, कम्युनिस्ट विचारवंत परमेश्वरन यांचे निधन
Published on

तिरुअनंतपुरम, ता.११ (वृत्तसंस्था) ः केरळमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला वाहून घेणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कम्युनिस्ट विचारवंत एम.पी.परमेश्वरन (वय ९१) यांचे आज निधन झाले. थ्रिसूरमध्ये १९३५ साली जन्मलेल्या परमेश्वरन यांनी ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधून अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली होती त्यानंतर ते मुंबईतील ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’ येथे सेवेत रुजू झाले.
केरळच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज’मध्ये त्यांनी साहाय्यक संचालक म्हणून देखील काम केले. ‘मॉस्को पॉवर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट’मधून त्यांनी आण्विक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पी.एचडी ही पदवी मिळवली होती. भाषा संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करताना त्यांनी भाषिक संशोधनात देखील महत्त्वपूर्ण काम केले. टाइप रायटरसाठी वापरण्यात येणाऱ्या मल्याळी कळफलकाची देखील त्यांनी निर्मिती केली. केरळमध्ये परमेश्वरन यांच्या पुढाकारानेच शास्त्र साहित्य परिषदेची (केएसएसपी) १९६२ मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यामध्ये विज्ञानाचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी वेगळी मोहीमच सुरू केली. शास्त्र परिषदेच्या यशानंतर ‘भारत जन विज्ञान जत्था’ आणि ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ (एआयपीएसएन) यांच्या माध्यमातूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी चळवळ सुरू केली.

- भारतातील २५ राज्यांमधील विज्ञान संस्था आणि चळवळींचे जाळे असलेल्या ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ (एआयएसपीएन) च्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अणुऊर्जा अभियंता म्हणून काम करताना त्यांनी विज्ञानाशी संबंधित तीसहून अधिक पुस्तके लिहिली.

- किरणोत्सर्ग, अणुविज्ञान, खगोलशास्त्र, गणित, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि पर्यावरण आदी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. ‘बुक्स फॉर निओलिटरेट्स’ आणि ‘बेसिक अँड कल्चरल लिटरेचर’साठी त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले. बालसाहित्यनिर्मितीसाठी देखील त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

- परमेश्वरन यांचा फार पूर्वीपासून कम्युनिस्ट पक्षाकडे ओढा होता. तीन दशकांहून अधिककाळ ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते, एका पुस्तकावरून वाद झाल्याने त्यांना २००४ मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते. विकेंद्रित लोकशाहीचा पाठपुरावा करताना त्यांनी मार्क्सवादी विचारांना आव्हान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com