

ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत
मधु कांबीकर यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे सोमवारी (ता. १२) पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या.
२०१६ मध्ये लावणी सादर करत असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे लागले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लावणी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या.
लावणी आणि सहजसुंदर अभिनयासाठी मधु कांबीकर यांची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या खास शैलीतून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. लावणी क्षेत्रासह अभिनयातही त्यांचे मोठे योगदान होते. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. विशेषतः आई आणि सासूच्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तब्बल १२ वर्षांनंतर त्या या कार्यक्रमातून पुन्हा एकदा मंचावर नृत्य सादर करणार होत्या. मात्र, नृत्य सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यानंतरही त्यांनी नृत्य सादर करणे थांबवले नाही. जिद्दीने त्यांनी आपले सादरीकरण पूर्ण केले. त्यानंतर त्या मेकअप रूममध्ये गेल्या. तेथे त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला.
जीवनगौरव पुरस्काराने गौरव
मधु कांबीकर यांचे अभिनय क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन २०१८ मध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.