पंढरपूरच्या उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे  यांची निवड

पंढरपूरच्या उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड

Published on

UPR26B07278
पंढरपूर : उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना उमेश परिचारक व नूतन नगरसेवक.
---
पंढरपूरच्या उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे
स्वीकृत सदस्यपदी शिरसाट, ॲड. वाळूजकर, थिटे यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १६ : पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारक गटाचे (पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे) नगरसेवक महादेव धोत्रे यांची तर परिचारकांच्याच नेतृत्वाखालील भाजप आणि मित्रपक्ष आघाडीकडून स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मणराव शिरसाट, ॲड. सुनील वाळूजकर, सौरभ थिटे यांची निवड करण्यात आली. या सर्वांच्या निवडीनंतर समर्थक, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पंढरपूर नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १६) पालिकेच्या सभागृहात पार पडली. पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रणिता भालके या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. महेश रोकडे तसेच पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर नगरपालिकेमध्ये परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजप तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. तर विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला केवळ ११ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. उपनगराध्यक्षपदाची निवड होणार असल्यामुळे परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजप तसेच त्यांच्या शहर विकास आघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. धोत्रे यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करून फटाके देखील फोडण्यात आले.
त्यानंतर पालिकेत माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे प्रमुख तथा युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारकांनी महादेव धोत्रे तसेच त्यांच्या आघाडीकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीनही स्वीकृत नगरसेवकांचे पेढे भरवून तसेच पुष्पहार घालून अभिनंदन केले. उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांच्या निवडीनंतर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गटनेते भागवत बडवे व सुजित सर्वगोड, भाजप व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते
---
चौकट
आता विविध समित्यांच्या निवडीकडे लक्ष
पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पालिकेच्या विविध समित्यांच्या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संख्याबळानुसार सर्व समित्यांवर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजप तसेच त्यांच्या आघाडींचाच वरचष्मा राहणार, हे निश्चित आहे. तरी देखील समित्यांच्या सभापतिपदी त्यांच्या गटाच्या कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com