विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेऊ - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra ahead development works  Ajit Pawar Mahavikas Aghadi pune

विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेऊ - अजित पवार

पुणे : कोरोना कालावधीत राज्य सरकारने नागरिकांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले असले तरीही विकासकामांना कोणतीही खीळ बसणार नाही, याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. सर्वच क्षेत्रात राज्याला पुढे ठेवले असून, ते पुढेच राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राज्य सरकारच्या विविध योजनांचे सचित्र दर्शन घडवणारे ‘दोन वर्षे जनसेवेची; महाविकास आघाडीची’ या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित हे प्रदर्शन ५ मे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.गेल्या दोन वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे योजना नागरिकांपर्यंत चांगल्यारीतीने पोहोचतील, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली. या वेळी प्रदर्शनामध्ये ३६० अंश सेल्फी पॉईंटवर उपमुख्यमंत्री पवार यांनी मोबाईल सेल्फी काढली.

प्रारंभी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या प्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते.