esakal | पुणे : सकाळी गैरसोय; दुपारी दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Laxmi Road Pune
पुणे : सकाळी गैरसोय; दुपारी दिलासा

पुणे : सकाळी गैरसोय; दुपारी दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्याने दुपारपर्यंत लक्ष्मी रस्ता, मार्केट यार्ड यांसह प्रमुख बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी तीननंतर काही व्यापाऱ्यांनी दुकाने, हॉटेल्स उघडण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठप्प झालेले जनजीवन दुपारनंतर सुरळीत होण्यास सुरुवात झाली.

आज सकाळपासून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, तुळशीबाग, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडई, लष्कर, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, नेहरू रस्ता यांसह इतर भागातील प्रमुख रस्त्यांवरील बाजारपेठ बंद होती. शहरातील हॉटेलचालकांनीदेखील बंदमध्ये सहभाग नोंदविला होता.

मध्यवर्ती भागात बाजारपेठ पूर्ण बंद असली तरी उपनगरांमध्ये त्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. सकाळपासून किराणा दुकाने, सलून, गॅरेज, खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्टेशनरी दुकाने, कपड्यांची दुकाने सुरू होती. दुपारनंतर दुकाने खुली झाल्याचे चित्र दिसले.

हेही वाचा: MPSC परिषद : ‘बिनधास्त बोला’तून दबलेल्या प्रश्नांना मिळालं व्यासपीठ

दुचाकी रॅलीद्वारे निषेध

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीतील पक्षांसह इतर संघटनांनी भाजपविरोधात आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध सभा झाली, तर जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता, जनवाडी, परिहार चौक, बोपोडी मुळा रस्ता, शिवाजीनगर मार्गे दुचाकी रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. या रॅलीची चतुःशृंगी मंदिर येथे सांगता करण्यात आली.

अनुचित घटना नाही

पुणे - बंद शांततेत पार पडला, त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासह शहराच्या वेगवेगळ्या भागात अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात बंडगार्डन, हडपसर, शिवाजीनगर, विश्रामबाग व सिंहगड रोड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आंदोलने झाली. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलकांनी कोपरा सभा घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन संपले. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, ‘‘सर्व आंदोलक पक्ष, संघटना यांच्याशी पोलिसांनी समन्वय ठेवला होता.’

loading image
go to top