

दुष्काळी मदतीसाठी केंद्राचे पथक राज्यात
राज्य सरकारचे सादरीकरण; विविध विभागांनी दिली दुष्काळी परिस्थितीची माहिती
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने राज्य सरकारकडून प्राथमिक माहिती घेतली. या वेळी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी लावलेले निकष, पीकस्थिती, पाणीसाठा, चारा, पिकांचे पंचनामे आणि विभागनिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी राज्यातील सद्यःस्थितीची माहिती पथकासमोर सादर केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मदतीसाठी ५३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
केंद्र सरकारची तीन पथके महाराष्ट्रात आली असून, कृषी विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सांख्यिकी विभागाचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, निती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. साक्षी भदोरिया यांनी सह्याद्री अतिथीगृहात आढावा घेतला. या वेळी कृषी, मदत व पुनर्वसन, पाणीपुरवठा, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन, सहकार, वित्त व नियोजन आदी विभागांसह अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, यासाठी कोणते निकष लावले, तसेच दुष्काळ जाहीर करताना केंद्र सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार कार्यवाही केली आहे का, याचाही आढावा घेण्यात आला. राज्यातील आठ कृषी विभागांतील २६५ तालुक्यांतील ३२ हजार ९२७ गावांपैकी २६ हजार १३१ गावांतील पिकांचे पंचनामे केले आहेत. सध्या दुष्काळी तालुक्यांतील ६० टक्के क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत. लातूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांत वेगाने पंचनामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मराठवाडा आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे परिणाम जाणवत असल्याची माहिती देण्यात आली.
केंद्र सरकारची तीन पथके महाराष्ट्रात दुष्काळी पाहणीसाठी आली असून, एक पथक पुणे विभागातील अहिल्यानगर आणि दुसरे पथक नागपूर विभागात पाहणी करणार आहे.
पुणे विभागातील पथकात कृषी विभागातील संचालक डॉ. के. पुन्नास्वामी, पाणीपुरवठा विभागाचे अबसर खान, राष्ट्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा पाहणी करणार आहेत.
नागपूर विभागातील पथकात जलशक्ती मंत्रालयातील संचालक अर्जिश कुमार मुधोक, वित्त विभागाचे सहसंचालक महेश कुमार, कृषी विभागाच्या अवर सचिव सीमा राणी आणि राष्ट्रीय संशोधन आणि विकास विभागाचे अवर सचिव संजय मीणा यांचा समावेश आहे. हे पथक तीन विभागांतील नऊ जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या जिल्ह्यांमध्ये यावेळी चर्चेनंतर बदल करण्यात आला आहे. जेथे गंभीर परिस्थिती आहे, तेथे हे पथक पाहणी करणार असून, रविवारी किंवा सोमवारी या पथकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.