

नव्याने १९ तालुके दुष्काळी
उपसमिती अध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केले होते ४३ तालुके
अॅग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : पहिल्या टप्प्यात २६५ तालुके दुष्काळी जाहीर केल्यानंतर गुरुवारी (ता.१) रात्री पुन्हा १९ तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. वास्तविक, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४३ तालुक्यांचा समावेश करण्यात येईल, असे सांगितले होते.
दरम्यान, खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळाची परिस्थिती लागू करण्यासाठी ट्रिगर-१ तालुक्यांव्यतिरिक्त आणखी १९ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून शासनास करण्यात आली होती. या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण, ग्राउंड ट्रुथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, असे निर्देशही उपसमितीने दिले आहेत.
नव्याने जाहीर केलेल्या तालुक्यांत नांदेडमधील मुदखेड, मुखेड व अर्धापूर, चंद्रपूरमधील जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर, गोंदियातील आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया, वर्धामधील कारंजा, भंडारा तालुक्यातील मोहाडी व तुमसर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड, साताऱ्यातील पाटण आणि सांगलीतील शिराळा व वाळवा या तालुक्यांचा समावेश आहे.
ट्रिगर-१ यादीतील तालुक्यांव्यतिरिक्त ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता आहे, त्यांचाही आवश्यकतेनुसार विचार करण्यासाठी स्थानिक पातळीवरील माहिती व अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीकपंचनामे तातडीने पूर्ण करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे, तसेच प्रशासन अधिक सतर्क ठेवण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
‘प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये’
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. दुष्काळाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.
खानेसुमारी जुळविण्यासाठी ‘कृषी’ची धावपळ
ज्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, त्या तालुक्यांतील पिकांचे पंचनामे करणे, केलेल्या पंचनाम्याची पेरणी क्षेत्राशी पडताळणी करणे, चारा उपलब्धता, मागील वर्षीचा उपलब्ध चारा, पशुसंख्या, संभाव्य बाधित फळबागा, त्यांचा इतिहास, यांसह अन्य बाबी पडताळून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा लागतो. त्यामुळे त्यासाठी कृषी विभागाची सध्या धावपळ सुरू आहे. पंचनाम्याची आकडेवारी अचूक नसेल, तर त्याचा परिणाम मदतीवर होऊ शकतो. त्यामुळे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.