Ajit Pawar
Ajit Pawar

कोरेगाव भीमा : विजयस्तंभास अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला आज (बुधवार) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी अभिवादनासाठी येत आहेत. अनुचित प्रकार घडू नये, अफवा पसरू नयेत, यासाठी इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली असून, कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज सकाळपासून राज्यभरातून हजारो संख्येने भाविक याठिकाणी येत आहेत. उत्साहाचे वातावरण येथे असून, नागरिकांकडून रांगेत येऊन विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येत आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व जिल्हाप्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी इंटरनेट वापराला अडचण येते. तेव्हा नागरिकांना तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी खास "इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन'ची व्यवस्था जिल्हाधिकारी प्रशासनाने केली आहे. तसेच, पोलिस व अन्य सेवांसाठी खास हॉटलाइनचीही व्यवस्थाही केली आहे. 

या परिसरातील खासगी कंपन्या, शाळा, आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यंदा पोलिसांनी चांगली व्यवस्था केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर, प्रशासनाकडून सर्व काळजी घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

सोशल मीडियावर लक्ष 
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमातून समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा समाजविघातक वक्तव्ये केली जाऊ नयेत, यादृष्टीने संबंधितांना जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे सूचना दिल्या आहेत. अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करून पथके नेमली आहेत. शांततेचे फलक, होर्डिंग्जच ठेवले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले.

वाहतुकीत बदल 
पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत आज (बुधवार) रात्री 12 पर्यंत बदल करण्यात आला आहे. पेरणे टोल नाका ते शिक्रापूरदरम्यान केवळ अंतर्गत प्रवासासाठी असलेल्या बस वगळता इतर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शिक्रापूर ते खराडी बायपास दरम्यानची जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com