
पुणे : राज्यातील जवळपास ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ऑनलाइन नोंदणीद्वारे ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना एका अर्जातच विविध भागातील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १९ मेपासून सुरू होणार असून, अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टला सुरू होतील. तर, ही प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा मानस आहे.