12 वर्षात करता आले नाही ते आम्ही आधीच केले

12 वर्षात करता आले नाही ते आम्ही आधीच केले
Published on

बारा वर्षांत करता आले नाही,
ते आम्ही आधीच केले

सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर चर्चेदरम्यान जयंत पाटील यांची टीका

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : ‘‘२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही, असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये मनमोहन सिंग आणि शरद पवार यांनी तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. तुम्हाला १२ वर्षांत जे करता आले नाही, ते आम्ही तुमच्या आधी केले. त्यावेळी राज्यातील तब्बल ४२ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला होता,’’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला विरोध केला.
नियम २९३ अन्वये सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावर त्यांनी जोरदार भाषण केले. १९४७ नंतर २०१४ मध्ये प्रथमच कर्जमाफी झाली, या दाव्याला त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘देशात १२ वर्षांपासून भाजपचे सरकार असून शेतकऱ्यांची काय अवस्था केली, हे जगजाहीर आहे. पण सत्ताधारी पक्ष अजूनही आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती लपविण्यात किंवा त्याबद्दल खरे न बोलण्यात जास्त रस ठेवतो. देशाच्या लोकसभेत जवाहरलाल नेहरू यांना दोषी धरण्यात येते. तसे राज्यात सत्ताधारी करू पाहत आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार पंढरपुरात उपोषणाला बसले. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा. २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्याचा निर्णय मागे घ्या. आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापक दिलासा देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात, या त्यांच्या मागण्या होत्या. यात काही गैर नव्हते,’’ असे पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य कृषी कर्जमाफी व कर्जसवलत योजना २००९ साली आघाडी सरकारने राबविली होती. त्यात जे शेतकरी केंद्राच्या कर्जमाफीतून वंचित राहिले, त्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारने केला होता. २००९ साली ‘फयान’ नावाचे चक्रीवादळ आले होते. तेव्हा तत्कालीन केंद्र सरकारने राज्याला १३०० कोटींहून अधिकची मदत केली होती. पण २०२० साली निसर्ग चक्रीवादळ आले तेव्हा फक्त २६८ कोटी रुपये देण्यात आले. २००९-२०१४ दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाही आम्ही राबवली होती. आता जे आपण ५० हजार प्रोत्साहनपर मदत देत आहोत, ती या योजनेआधारेच आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात २०१९ ला कर्जमाफी केली. २०१६ साली तुम्ही राबवलेल्या कर्जमाफी योजनेत मर्यादा दीड लाख होती. ती वाढवून आम्ही २ लाख केली. सरकारने यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना सुरू केली. त्यात मर्यादा २ लाखच ठेवली आहे. तुम्ही नवीन काय केलं? त्यात कौतुक करण्यासारखं इतकं काय आहे? २ लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्यांनी आधी वरचे पैसे स्वतः भरावे आणि मग २ लाखांपर्यंत माफ होईल, अशी अट ठेवली आहे. म्हणजे बँकांचे पैसे वसूल करण्यासाठी तुम्ही ही योजना आणली आहे, असा त्याचा अर्थ होतो,’’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com