Sports : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सायकलपटू पूजा दानोळेने आपले वर्चस्व अबाधित ठेवत पदकांचा षटकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय सायकलपटू पूजा दानोळे

Sports : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सायकलपटू पूजा दानोळेने आपले वर्चस्व अबाधित ठेवत पदकांचा षटकार

जबलपूर- महाराष्ट्राच्या खेळाडूंची खेलो इंडिया यूथ गेम्समधील पदकांची लूट गुरुवारीही कायम राहिली. कुस्ती, जलतरण, ज्युडो, कबड्डी या खेळांमध्ये पदकांवर मोहोर उमटवण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना यश लाभले. सायकलपटू पूजा दानोळे हिने या स्पर्धेमध्ये सहाव्या पदकाला गवसणी घालताना देदीप्यमान कामगिरी केली.

कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सायकलपटू पूजा दानोळेने आपले वर्चस्व अबाधित ठेवत पदकांचा षटकार नोंदवला. तिने रोडच्या ६० किमी अंतराच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी धडक मारली. पूजाने ही शर्यत २ तास १३ मिनिटे ४८.९४१ सेकंदात पूर्ण केली. त्यामुळे तिला या प्रकारामध्ये रौप्यपदक देऊन गौरविण्यात आले.

तिने सुवर्ण हॅट्‌ट्रिकसह दोन रौप्य व एक ब्राँझपदकाची कमाई केली. पूजाच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला सायकल रोड रेसमध्ये चॅम्पियनशिप देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांचा बहुमान मिळवता आला. महाराष्ट्र संघाने सायकलिंग स्पर्धेत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ ब्राँझपदकांची कमाई केली आहे.

भक्ती वाडकरचे सोनेरी यश

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणामधील पदकांची लयलूट कायम राखली. त्याचे श्रेय आज सुवर्ण चौकार पूर्ण करणारा वेदांत माधवन, बॅक स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी भक्ती वाडकर, रौप्यपदक जिंकणारी पलक जोशी, ब्राँझपदक जिंकणारे शुभंकर पत्की, प्रतीक्षा डांगी यांना द्यावे लागेल. यांच्या या यशावर शिखर चढवताना मुलांच्या संघाने रिले शर्यतीत महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला.