

उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते
‘महाराष्ट्र पॅव्हिलियन’चे उद्घाटन
राजधानीत भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली,ता.१४ : दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित ''भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२६'' मधील महाराष्ट्र पॅव्हिलियनचे आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन केले. महाराष्ट्राच्या दालनात यंदा दुप्पट ते तिप्पट उलाढाल होण्याची अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ संकल्पनेनुसार राज्यातील स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळावी, यासाठी महाराष्ट्राच्या दालनात ६४ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये महिला बचत गट आणि लघुउद्योजकांनी सहभाग घेतला आहे. मागील वर्षी येथे सात ते आठ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती, ती यंदा दुप्पट ते तिप्पट होईल, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. दिल्लीतील पाच हजार चौरस फुटांच्या ''महाराष्ट्र एम्पोरियम''च्या नूतनीकरण व विस्तारासाठी पाच कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी जाहीर केले. ‘विकास आणि वारसा’ या संकल्पनेवर आधारित पारंपरिक वाडा शैलीतील या दालनाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी शिल्पे साकारली आहेत. दालनात पैठणी, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, बंजारा कला, मसाले आणि ''जीआय टॅग'' प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे.
२४ नोव्हेंबरला ‘द फोक आख्यान’
येत्या २४ नोव्हेंबर रोजी दुपारी भारत मंडपम येथील ओपन ॲम्फीथिएटरमध्ये ‘द फोक आख्यान’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.