महाराष्ट्रानं राबवावा बारामती पॅटर्न, जाणून घ्या बारामतीच्या कोरोना लढाई विषयी... 

मिलिंद संगई
Friday, 8 May 2020

कोरोनाचे रुग्ण बारामतीत सापडल्यानंतर लॉकडाउन अधिक कडक झाले.

बारामती (पुणे) : कोरोनामुक्तीसाठी अनेक ठिकाणी विविध उपाययोजना केल्या गेल्या, मात्र पश्चिम महाराष्ट्रात बारामतीच्या प्रशासनाने राबविलेला "बारामती 44 पॅटर्न' हा चांगलाच यशस्वी ठरला. केंद्रीय पथकानेही या पॅटर्नची आवर्जून दखल घेत देशातील छोट्या शहरात हा पॅटर्न राबवायला हवा, अशी शिफारस करण्याचे नमूद केले. त्यामुळे त्याची चर्चा अधिक झाली. 

शाळांच्या येत्या शैक्षणिक वर्षाबाबत झाला मोठा निर्णय

कोरोनाचे रुग्ण बारामतीत सापडल्यानंतर लॉकडाउन अधिक कडक झाले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या हातात सूत्रे घेत बारामतीत "भिलवाडा पॅटर्न' राबविण्याचे निश्‍चित केले. प्रशासनाला तशा सूचना मिळाल्या. त्यानंतर त्याचा अभ्यास सुरू झाला. 
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, यांच्यासह आरोग्य, नगरपालिका, पंचायत समितीचे सर्वच कर्मचारी यांनी टीम वर्क करत "भिलवाडा पॅटर्न'मध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेत वेगळा "बारामती पॅटर्न' तयार केला. 

स्मार्ट सिटीच्या आकडेवारीत विसंगती

जीवनावश्‍यक वस्तू घरपोच 
या "बारामती पॅटर्न'मध्ये शहराच्या 44 वॉर्डाच्या रचनेनुसार लोकांनी रस्त्यावर येऊ नये, यासाठी सर्व जीवनावश्‍यक वस्तू लोकांना घरपोच देण्याची योजना आखली गेली. यात प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक, एक नगरपालिकेचा क्षेत्रीय अधिकारी व एक पोलिस कर्मचारी, अशा तिघांचे पथक नेमले गेले. प्रत्येक पोलिसाला दुचाकी व एक वॉकीटॉकी संच दिला गेला. जेणेकरून त्या भागात कोणत्याही ठिकाणी तो काही क्षणात पोहोचावा, अशी या मागे संकल्पना होती. यात लोकसंख्यानिहाय स्वयंसेवकांची नियुक्ती केली गेली. तीस कुटुंबामागे एक स्वयंसेवक, असे प्रमाण निश्‍चित करून स्वयंसेवकांचे मोबाईल क्रमांक सोशल मिडीयावर टाकले गेले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय पथकाकडून कौतुक 
स्वयंसेवकांनी हे काम करताना वेळ व काळ पाहिला नाही, केवळ प्रशासनाला मदत व लोकांची सेवा, याच उद्देशातून हे काम केले. किराणापासून ते औषधांपर्यंत आणि दुधापासून ते इतर पदार्थांपर्यत अनेक बाबी या स्वयंसेवकांनी रुपयाचाही मोबदला न घेता सामाजिक जाणिवेच्या बांधिलकीतून केले. त्यांच्या या टीमवर्कचे आणि लोकसहभागाचे कौतुक केंद्रीय पथकानेही केले. बारामतीत केंद्रीय दोन पथके येऊन गेली. येथे लॉकडाउनच्या काळात लोकांना घरात बसा म्हणून सांगितल्यावर त्यांना जो प्रभावी पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला, त्याची प्रशंसा या पथकाने केली. विशेष म्हणजे बारामतीकरांनीही आज 50 दिवस उलटल्यावरही कमालीचा संयम दाखविला आहे. 20 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाउन आजतागायत सुरू आहे, मात्र तरीही लोकांनी अजिबात घाई न करता घरातच बसणे पसंत केले. अनेक अडचणी व गैरसोयींना नागरिकांनाही तोंड द्यावे लागले. मात्र, अडचणींवर मात करत या संकटाला बारामतीकर धीरोदात्तपणे सामोरे गेले, याचेही कौतुक केंद्रीय पथकाने केले. 

नागरिकांची एकजूट 
बारामतीत रुग्ण सापडले, दोघांचा मृत्यूही झाला, मात्र 14 एप्रिलनंतर मात्र बारामती शहरात एकही रुग्ण सापडला नाही. बारामतीकरांनी या संकटावर सामूहिकपणे मात केली, हे यश म्हणाले लागेल. सर्वांनीच प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांना मनापासून साथ दिल्यानेच हे यश मिळाले. पोलिस यंत्रणा, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा, सिल्व्हर ज्युबिली, महिला ग्रामीण रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, महसूल यंत्रणा यांनी घेतलेल्या प्रचंड कष्टाला तोड नाही. तळपत्या उन्हात कोरोनाच्या प्रादुर्भावाची पर्वा न करता या यंत्रणेने ज्या धाडसाने काम केले, त्यामुळे बारामती पॅटर्न यशस्वी झाला. कोरोना सोल्जर्स, कोरोना वॉरिअर्स सारख्या संकल्पना यशस्वी झाल्या. बारामतीकरांनी एकजुटीने यात सहभाग नोंदविला. 

केलेल्या प्रमुख उपाययोजना 
- नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची व्यवस्था. 
- प्रत्येक वॉर्डात नगरसेवक, अधिकारी व पोलिस कर्मचारी या तिघांचे पथक. 
- मदतीसाठी तीस कुटुंबामागे एक स्वयंसेवक. 
- कोरोना सोल्जर्स, कोरोना वॉरिअर्स या संकल्पनांचा वापर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra should implement Baramati pattern