कोल्हापूरः ‘मार्केट सेस’ रद्दसाठी २ ऑक्टोबरपासून ‘असहकार’

कोल्हापूरः ‘मार्केट सेस’ रद्दसाठी २ ऑक्टोबरपासून ‘असहकार’
Published on

‘मार्केट सेस’ रद्दसाठी २ ऑक्टोबरपासून ‘असहकार’
--
राज्यव्यापी व्यापारी परिषदेत निर्धार; पाच लाख व्यापारी सहभागी होण्याचा दावा
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तसेच आवाराबाहेरील ‘मार्केट सेस’ रद्द करण्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून राज्यभरातील व्यापारी ‘ना सेस भरून घेणार, ना भरणार’ या भूमिकेतून असहकार आंदोलन करणार आहेत. कोल्हापुरात झालेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेत याबाबतचा निर्धार करण्यात आला.

चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दिपेन आगरवाल आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशनतर्फे नागाळा पार्क येथील नष्टे लॉन येथे ही परिषद झाली. रविवार (ता. ९)पूर्वी लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना आणि बाजार समित्यांना मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला. त्यानंतर समाजमाध्यमांद्वारे राज्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. पुढील राज्यव्यापी परिषदा मुंबई आणि नाशिक येथे घेण्याचेही ठरविण्यात आले.

आगरवाल म्हणाले, ‘‘सरकारने बाजार समित्यांना उपविधींमध्ये तरतूद करून रवा, मैदा, तेल, डाळी आणि ड्रायफ्रूटवर सेवा शुल्क आकारण्याचा अधिकार दिला आहे. मार्केट सेससह ‘जीएसटी’चीही आकारणी होत असल्याने व्यापारी, ग्राहक आणि शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत आहे. त्याविरोधात महात्मा गांधी जयंतीपासून असहकार आंदोलन पुकारण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे पाच लाख व्यापारी त्यात सहभागी होतील. सेस रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.’’

माणगावे म्हणाले, ‘‘मार्केट सेस रद्द करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री, पणनमंत्री आणि सरकारसोबत आतापर्यंत चार वेळा चर्चा झाली; मात्र तोडगा निघालेला नाही. सेस आकारूनही व्यापाऱ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. ‘जीएसटी’बरोबरच सेसही आकारला जात असल्याने व्यापाऱ्यांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे.’’

पुण्याचे राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘सरकारला मिळणाऱ्या अडीच टक्के ‘जीएसटी’मधील रक्कम बाजार समित्यांना देऊन मार्केट सेस रद्द करावा.’’

परिषदेला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, मोहन गुरनानी, भीमजी भानुशाली, जितेंद्र शहा, संजीव परीख, अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, अमृतलाल जैन आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com