Vidhan Sabha 2019 : समन्वयासाठी आघाडीच्या दिवसाआड बैठका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार धडाक्‍यात सुरू राहावा, यासाठी दोन्ही पक्षांची शहरस्तरावरील सुमारे २० नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आता दिवसाआड बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातून प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र व्यूहरचना करण्यात येत आहे.

विधानसभा 2019 : पुणे - शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार धडाक्‍यात सुरू राहावा, यासाठी दोन्ही पक्षांची शहरस्तरावरील सुमारे २० नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आता दिवसाआड बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातून प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र व्यूहरचना करण्यात येत आहे.

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला आणि पर्वतीमध्ये; तर कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसब्यात काँग्रेसचे उमेदवार आहेत. कोथरूड मतदारसंघात आघाडीने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात समन्वय राहावा, यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. तसेच, प्रत्येक मतदारसंघासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका नेत्याकडे संयुक्तपणे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. दोन्ही पक्षांचे कोणकोणते नेते प्रचारासाठी येणार, त्यांच्या सभा कोठे घ्यायच्या, त्यासाठीचे नियोजन कसे करायचे आदी विविध मुद्द्यांवर समितीमध्ये चर्चा होत असून, त्यानुसार प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे. समन्वय समितीचे काँग्रेसकडून मोहन जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार वंदना चव्हाण प्रमुख आहेत.

प्रत्येक मतदारसंघातील बूथ याद्यांनुसार काम करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही पक्षांचे युवक, महिला, कामगार, युवती आदी विविध सेलकडेही विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरही दोन्ही पक्षांचा प्रचार परस्परांना पूरक असेल, यावर भर देण्यात येत आहे. आघाडीने आठही उमेदवारांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच, त्यांच्याकडून होत असलेल्या प्रचारात राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्द्यांचा समावेश असेल, याबाबतही समन्वय समितीने लक्ष घातले आहे.

समन्वय समितीमध्ये काँग्रेसकडून शरद रणपिसे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, आबा बागूल, अजित दरेकर, सचिन तावरे; तर राष्ट्रवादीकडून जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, बापू पठारे, अंकुश काकडे, प्रशांत जगताप, विशाल तांबे, अशोक राठी आदींचा समावेश आहे.

काँग्रेसच्या परंपरागत मतदारांपर्यंत पोचणे आणि बूथस्तरावरील कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेशी जोडून घेण्यात आले आहे. त्यामुळे आठही मतदारसंघांत प्रचाराला वेग आला आहे. 
- मोहन जोशी, काँग्रेस

प्रचारात एकसूत्रता असावी, हा समन्वय समितीचा उद्देश आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. आता शहरस्तरावर दिवसाआड बैठका सुरू आहेत. दोन्ही पक्षांचे विविध सेलही एकत्रितपणे कार्यान्वित झाले आहेत.
- वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 aghadi Coordination meeting politics