
फक्त पर्यावरणाच्या नावाने ओरडायचे
तुमची सत्ता होती तेव्हा एक तरी झाड लावले का? उगीच पर्यावरणाच्या नावाने ओरडत आहेत. आमच्या सरकारने ५० हजार झाडे लावली. वन संरक्षित करण्यासाठी सीमाभिंत बांधली. तुम्ही बीडीपी, बीडीपी म्हणता. पण, तुमच्याच नगरसेवकांनी बीडीपीत अतिक्रमण करून घरे बांधली, अशी टीका भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव न घेता केली.
विधानसभा 2019 : पुणे - अजित पवार यांनी मला ‘चंपा’ म्हटल्यानंतर राज ठाकरे हेदेखील तेच म्हणत आहेत. मी ठाकरे यांना प्रगल्भ समजत होतो. त्यामुळे त्यांनी काही तरी वेगळे म्हणायला पाहिजे होते, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली. माझ्या कर्तृत्वावर बोलता येत नाही म्हणून तुम्ही अशी टीका करणार असाल, तर तुुमच्यावर बोलायला लागलो; तर महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यभरात महायुतीच्या कमीत कमी २२० जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज ठाकरे चांगले व्यक्तिमत्त्व आहे. पण, शरद पवार हे सांगतील तेच ते बोलतात. अजित पवारांप्रमाणे राज ठाकरे यांनी मला ‘चंपा’ म्हटले. माझी आईदेखील मला लाडाने ‘चंद्या’ म्हणते; तर विरोधकही प्रेमापोटी ‘चंपा’ म्हणतात, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
गिरीश बापट म्हणाले, ‘‘पुणे शहर व जिल्ह्यात हजारो कोटींची विकासकामे सुरू आहेत. गेल्या ५० वर्षांपासूनचा काँग्रेसचा उकीरडा बाजूला काढून या देशाचे नंदनवन केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने अनेक योजनांचा नारळ फोडला. पण, पुणेकरांना काहीच मिळाले नाही. नारळातील पाणीही तेच पिऊन गेले. त्यांनी कामे न केल्याने त्यांना आता दुर्बीण घेऊन शोधावे
लागत आहे.’’या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अमर साबळे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भाषणे झाली. महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, सिद्धार्थ शिरोळे, खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित होते.