Vidhan Sabha 2019 : कलाटेंमुळे चिंचवडमध्ये तुल्यबळ लढत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

मी शिवसेनेकडून इच्छुक होतो. परंतु, महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला गेली. मतदारसंघातील कुठल्यातरी एका भागाचा विकास म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही. समतोल आणि शाश्‍वत विकासासाठी आपण शिवसेनेकडून मिळालेल्या महत्त्वाच्या पदांची पर्वा न करता जनतेचा उमेदवार म्हणून आपण निवडणुकीत उतरलो आहोत. प्रस्थापित आणि हुकूमशाही विरोधातील ही लढाई आहे. त्यामुळे जनसामान्यांचा आपल्याला वाढता पाठिंबा आहे.
- राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार

विधानसभा 2019 : चिंचवड - चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवारच नसल्याने निवडणूक एकतर्फी मानली जात होती. मात्र, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारल्याने तुल्यबळ लढत होणार आहे. वंचित आघाडी, समाजवादी पक्षाचा पाठिंबा तसेच वाकड, थेरगावसह गावागावांमध्ये झालेल्या बैठकांमधून ग्रामस्थांनी कलाटे यांना दिलेला पाठिंबा दिला आहे. 

या मतदारसंघात प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या महाआघाडीकडे तगडा उमेदवार नव्हता. त्यामुळे त्यांनी राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले. वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच भाजप-शिवसेनेतील नाराजांची छुपी रसद मिळत आहे. वाकड, थेरगावातील ग्रामस्थांनी तसेच विविध सोसायट्यांनी बैठका घेत पाठिंबा दिल्यामुळे अपक्ष असूनही त्यांची उमेदवारी चर्चेत आली आहे. कलाटे हे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आहेत.

तसेच विद्यमान शिवसेनेचे गटनेते व स्थायी समिती सदस्य आहेत. वाकडसह थेरगाव, पिंपळे निलख या भागात कलाटे यांचे प्राबल्य आहे. याखेरीज चिंचवड, पिंपळे गुरव, रावेत, सांगवी या भागात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधकांची साथ जमेची बाब ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Chinchwad Rahil kalate politics