Vidhan Sabha 2019 : विकासासाठीच राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला -

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून युवा कार्यकर्ते राहुल कलाटे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पवार यांनी कलाटे यांना पाठिंबा देण्यामागील भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. कलाटे यांना वंचित विकास आघाडीनेही पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षांनी या मतदारसंघातून उमेदवार दिलेले नाहीत.

पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, भाजपने शहराची वाट लावली आहे. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता प्रभागवार प्रचारयंत्रणा राबवावी. भाजपने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडावीत.’’ 

कलाटे म्हणाले, ‘‘चिंचवडचा मतदार हा सुज्ञ आहे. विकास कोणी केला, कोणाच्या नेतृत्वाखाली झाला, हे येथील जनता जाणून आहे. चिंचवडचा सर्वांगीण आणि समतोल विकास करण्यास प्राधान्य राहील. शंभर टक्के शास्तीकर माफी, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सुटसुटीत नियमावली, उपनगरातील कचरा समस्या, नदीसुधार, आयटीयन्सला चोवीस तास पाणी, हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उड्डाण पूल, हिंजवडी ते चाकण मेट्रोसाठी पाठपुरावा करणार आहे.’’

या वेळी अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, रंगनाथ फुगे, वैशाली घोडेकर, कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, वैशाली काळभोर, विशाल वाकडकर, वर्षा जगताप, फजल शेख उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 development rahul kalate support ajit pawar NCP Politics