भोसरीतील अपक्ष परंपरा खंडित Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

लांडगे यांची जमेच्या बाजू 
- 2014 च्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सुलभा उबाळे व भाजपचे एकनाथ पवार यांचे पाठबळ 
- मतदारसंघातील 43 पैकी 34 नगरसेवक समर्थक 
- गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम व विकास कामांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क 
- समाविष्ट गावांमध्ये विकास कामे सुसाट

भाजपचे महेश लांडगे तब्बल पाऊण लाखांनी विजय 
पिंपरी - भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून अपक्षांचा विजय झाला आहे. ही परंपरा या वेळी महेश लांडगे यांनी खंडित केली. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून त्यांनी मतदारसंघ स्वतःकडे राखला आहे. साधारणतः पाऊण लाखांच्या मताधिक्‍क्‍याने त्यांनी विजय प्राप्त केला आहे. 

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना 2008 मध्ये झाली. हवेली मतदारसंघांचे विभाजन करून भोसरी मतदारसंघ अस्तित्वात आला. यात 20 वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या दिघी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे आदी गावांचा समावेश आहे. कामगार बहूल मतदारसंघ अशी त्याची ओळख आहे. मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर 2009 मध्ये पहिली व 2014 मध्ये दुसरी निवडणूक झाली. दोन्ही वेळी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. पहिल्यांदा विलास लांडे व नंतर महेश लांडगे आमदार झाले. आता दोघेही प्रतिस्पर्धी होते. मतदारसंघाचा प्रथम आमदार होण्याचा मान लांडे यांना 2009 मध्ये मिळाला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

निवडणूक चिन्ह कपबशी होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुलभा उबाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंगला कदम होत्या. उबाळे यांनी कडवी लढत दिली होती. केवळ 1200 मतांनी लांडे विजयी झाले होते. 2014 मध्ये त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात लांडगे यांनी बंडखोरी केली.

अपक्ष निवडणूक लढविली व विजयी झाले. लांडे चक्क तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. याही वेळी दुसऱ्या स्थानावर शिवसेनेच्या उबाळे होत्या.

भाजपचे एकनाथ पवार चौथ्या क्रमांकावर होते. निवडून आल्यानंतर लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून भाजपचे सहयोगी आमदार लांडगे असा त्यांचा परिचय होता. मात्र, 2019 ची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढविली. त्यांच्या विरोधात महाआघाडीचे कोण? याची उत्सुकता होती. मात्र, लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. निवडणूक चिन्ह 2009 प्रमाणे कपबशीच ठेवले. ध्वजही पिवळ्या रंगाचा ठेवला. त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने पुरस्कृत केले. खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्यासाठी रोड-शो केला होता. मात्र, त्याचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे निकालानंतर दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Election result Mahesh Landage Win BJP