Vidhan Sabha 2019 : हडपसर : स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

हडपसर मतदारसंघात पाच वर्षांत कोणती विकासकामे केली, याचा लेखाजोखा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर हे प्रचारातून मांडत आहेत. तर दुसरीकडे कचरा, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्‍नामुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे चेतन तुपे आणि मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी केला आहे.

हडपसर मतदारसंघात पाच वर्षांत कोणती विकासकामे केली, याचा लेखाजोखा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर हे प्रचारातून मांडत आहेत. तर दुसरीकडे कचरा, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्‍नामुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे चेतन तुपे आणि मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी केला आहे. 

हडपसर मतदारसंघामध्ये महायुती, महाआघाडी आणि मनसेच्या उमेदवारांसोबतच प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाकडून कृपाल पलुस्कर, वंचित बहुजन आघाडीचे घनश्‍याम हाके, एमआयएमचे जाहिद शेख, तर अपक्ष म्हणून अंजुम इनामदार, अनुप शिंदे, अर्जुन शिरसाट, ॲड. जमीर शेख, तौसिफ शेख, राकेश वाल्मीकी आणि सुभाष सरवदे हे सातजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजकीय पक्षांकडून स्थानिक विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढविण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रचारादरम्यान, या मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लुल्लानगर चौकात उड्डाणपूल उभारला. सय्यदनगर येथे भुयारी मार्ग आणि खराडीत उड्डाण पुलाच्या कामाचे उद्‌घाटन झाले आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला. तसेच, विकासकामांबाबत विधिमंडळात प्रश्‍न मांडून ते सोडविल्याचा दावा टिळेकर यांनी केला आहे.   
तुपे यांच्याकडून ते नगरसेवक असताना गाडीतळ, मगरपट्टा चौकातील उड्डाण पूल, मुंढवा-मगरपट्टा सिटी यांना जोडणारा रेल्वे उड्डाण पूल, नाट्यगृह, उद्यान, क्रीडा संकुल अशी विकासकामे केल्याचे मुद्दे प्रचारात मांडले जात आहेत. मनसेचे उमेदवार मोरे यांनी नगरसेवक पदाच्या कालावधीत त्यांनी कात्रज भागासह मतदारसंघातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचा मुद्दा प्रचारात मांडला आहे. या मतदारसंघात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महादेव बाबर विजयी झाले होते. मागील २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे टिळेकर यांनी बाबर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत सेनेकडून बाबर आणि नगरसेवक नाना भानगिरे इच्छुक होते. परंतु महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ  भाजपकडे गेला. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक असून, भाजपचे १०, शिवसेनेचे तीन आणि मनसेचे दोन नगरसेवक आहेत. बाळासाहेब शिवरकर यांच्याकडे तुपे यांचे प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 hadapsar constituency politics