Vidhan Sabha 2019 : खडकवासला : नवीन मतदारांचा कौल निर्णायक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या खडकवासला मतदारसंघात पक्षांतर्गत वादामुळे राष्ट्रवादीला गेल्या दोन निवडणुकांत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला या नवीन मतदारसंघाचा समावेश २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेच्या वेळी झाला. तेव्हापासूनच पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या खडकवासला मतदारसंघात पक्षांतर्गत वादामुळे राष्ट्रवादीला गेल्या दोन निवडणुकांत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला या नवीन मतदारसंघाचा समावेश २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेच्या वेळी झाला. तेव्हापासूनच पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

खडकवासला मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर २००९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश वांजळे येथून पहिल्यांदा विजयी झाले. वांजळे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी ‘मनसे’कडून निवडणूक लढविली. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने सर्व ताकद पणाला लावली आणि विद्यमान आमदार भीमराव तापकीर विजयी झाले. 

राष्ट्रवादीने त्या वेळी वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते मतदारसंघात तळ ठोकून होते. पुणे शहराचाच भाग असलेल्या या मतदारसंघात त्यांनी घरोघरी जाऊन प्रचाराची धुरा वाहिली. त्यामुळे तापकीर यांच्या रूपाने येथे ‘कमळ’ फुलले.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेचा, तसेच विरोधी पक्षांमध्ये झालेल्या मतविभागणीचा फायदा घेत तापकीर या मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. शहरातील अनेक जण सिंहगड रस्ता व वारजे परिसरात, तसेच धनकवडीला स्थायिक झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील निवडणूक वातावरणाचा प्रभाव या मतदारसंघावर जाणवतो. लोकसभेच्या निवडणुकीतही भाजपने या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसवर मताधिक्‍य मिळविले होते. या पार्श्‍वभूमीवर आता विधानसभेची निवडणूक होत आहे.

तापकीर यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नगरसेवक सचिन दोडके यांचे तगडे आव्हान आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अप्पा आखाडे आणि बहुजन समाज पक्षाचे अरुण गायकवाड हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या मतदारसंघाचा चेहरामोहरा गेल्या पाच वर्षांमध्ये वेगाने बदलला आहे. उमेदवारांच्या नात्यागोत्यांच्या बरोबरीने नवीन मतदारांचा समावेश या मतदारसंघात झाला आहे. यातील बहुतांश मतदार हा सुशिक्षित आणि सोसायट्यांमध्ये राहणारा आहे. त्यामुळे त्यांच्या जवळचा उमेदवार देण्यासाठी पक्षनेतृत्वाने प्राधान्य दिल्याचे या तिकीटवाटपावरून दिसते. नात्यागोत्यांमधील हक्काच्या मतदारांच्या पलीकडे जाऊन नवीन मतदारांचा कौल या वेळी निर्णायक ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Khadakwsala new voter politics