Vidhan Sabha 2019 : आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

राज्य पातळीवर नेत्यांसह स्थानिक राजकीय पदाधिकारी व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत असले, तरी २०१४ च्याच निवडणुकीतील मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जात आहे. विशेष म्हणजे पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघांत २०१४ च्या लढतीतील प्रतिस्पर्धी याही वेळी आमने-सामने आहेत.

विधानसभा 2019 : पिंपरी - राज्य पातळीवर नेत्यांसह स्थानिक राजकीय पदाधिकारी व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत असले, तरी २०१४ च्याच निवडणुकीतील मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जात आहे. विशेष म्हणजे पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघांत २०१४ च्या लढतीतील प्रतिस्पर्धी याही वेळी आमने-सामने आहेत.

शहरातील तीनही मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाआघाडी असे चित्र आहे. वंचित बहूजन आघाडीची प्रचार वाहने रस्त्याने फिरताना दिसतात. अधून-मधून अन्य पक्ष व उमेदवारांचे कार्यकर्ते दृष्टीस पडत आहेत. मात्र महायुतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाआघाडीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा गेल्या आठ दिवसांत झाल्या. त्यांच्याकडूनही जुनेच मुद्दे सभांमध्ये वापरले गेले. महायुती असूनही शिवसेनेने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र त्यापूर्वी पिंपरीत झालेल्या सभेत ठाकरे यांनी त्यातील एक रुपयात आरोग्य तपासणी व दहा रुपयांत जेवण असे मुद्दे मांडले होते.

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, संपूर्ण शास्तीकर माफी, घनकचरा व्यवस्थापन, थेट पवना जलवाहिनी प्रकल्प, वाढीव पाणी कोट्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी, मेट्रो प्रकल्प, प्राधिकरणासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा, स्पाइन रस्ता बाधितांचे पुनर्वसन, उच्चक्षमता वहन मार्ग (एचसीएमटीआर) व त्यामुळे बाधित होणारी घरे, पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प आदी मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. शहराचा विकास मंदावल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे याच मुद्द्यांवर २०१४ ची निवडणूक लढविण्यात आली होती. त्या वेळी महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेना आणि महाआघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा चौरंगी लढती झाल्या होत्या. आता महायुती आणि महाआघाडी म्हणून लढत असल्याने सध्या दुरंगी लढतींचे चित्र आहे.

निकटचे प्रतिस्पर्धी जुनचे आहेत. फक्त काहींचे पक्ष बदलले आहेत, इतकाच फरक आहे. महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र चिंचवड व भोसरीतील अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. 

पाठिंब्यासाठी आटापिटा
महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांकडून अन्य समाज घटक, संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. काहींनी जाहीर पत्रके काढून पाठिंबा जाहीर केलेला आहे. गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी बहुतांश उमेदवारांचा कल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 politics pimpri chinchwad bhosari