
विधानसभा 2019 : पुणे - ‘राज्यातील धरणांमधील पाणी नद्यांमध्ये सोडून ते दुष्काळी भागांकडे वळविता येईल, अशी भूमिका मी महिनाभरापूर्वी मांडली होती. भाजपने आमचाच कार्यक्रम कॉपी करून नदीजोड प्रकल्प जाहीरनाम्यातून समोर आणला आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला.
उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवार पेठेतील शिवाजी आखाडा येथे आयोजित जाहीर सभेत ॲड. आंबेडकर बोलत होते. पुण्यातील सातही उमेदवारांसह नामदेव जाधव, महासचिव सचिन माळी, नवनाथ पडळकर, शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी, अनिल जाधव, युसूफ बागवान, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे उपस्थित होते. या वेळी ‘वंचित’चा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
ते म्हणाले, ‘‘महागड्या मेट्रोऐवजी जलवाहतूक सुरू केली असती तर स्वस्त वाहतूकव्यवस्था निर्माण झाली असती. शेती क्षेत्रातून छोटे-मोठे उद्योग निर्माण झाले, तर अनेकांना रोजगार मिळेल. सत्तेत आल्यानंतर करातून जमा होणाऱ्या २२ हजार कोटींचा वापर रोजगारनिर्मितीसाठी करू. किमान बेरोजगार भत्ता देऊ.’
‘मोदी, फडणवीसांच्या सरकारला वटणीवर आणू’
पिंपरी - ‘नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेलगाम घोड्यासारखे उधळले आहे. त्यांना रोखण्याची गरज आहे. आम्ही त्याला नुसते रोखणार नाही तर वठणीवर आणू,’’ असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी चौकात झालेल्या सभेत आंबेडकर बोलत होते. प्रा. नामदेवराव जाधव, वंचित आघाडीचे महासचिव अनिल जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले आहे की, आपल्याला महाराष्ट्र, हरियाना, झारखंड येथे यश मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी देशात बाँबस्फोट होण्याचा धोका असल्याची टुम काढली आहे. निवडणूक आल्यावर देशाला धोका असल्याचे भासविले जाते. मग सर्व शांत होते. भावनिक वातावरण निर्माण करून मते आणि सत्ता मिळविली जाते. मराठवाड्यात दुष्काळ पडला; परंतु पावसाला सुरवात झाल्याशिवाय तेथे छावण्या झाल्या नाहीत.’’
राष्ट्रवाद आणि अर्थव्यवस्थेवर बोलताना आंबेडकर म्हणाले, ‘‘देशात खोटा राष्ट्रवाद पसरविला जात आहे. अनेक गोष्टी घडत आहेत; परंतु त्या दाखविल्या जात नाहीत. त्यामुळे खोट्या राष्ट्रवादात अडकू नका. अर्थव्यवस्था बिघडली आहे, असे त्यांचे अर्थतज्ज्ञ पतीच ओरडून सांगत आहेत; मग आणखी कसला पुरावा हवा आहे. देशातील मंदीची लाट अनैसर्गिक आहे. तिला थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत; पण त्यांच्याकडे उपाययोजना नाहीत. उलट, बॅंकिंग व्यवस्था बुडल्याशिवाय राहणार नाही. वाट्टेल त्याला कर्ज दिली गेली. त्यांच्याकडे वसुलीची ताकद नाही. दोन बॅंका बुडाल्या; परंतु इतर राष्ट्रीयकृत बॅंका बुडण्यापासून तुम्ही वाचवू शकता. मतमोजणीचा निकाल लागण्याअगोदरच हे सरकार २८० जागा जिंकणार असल्याचे सांगत आहे. मग निवडणुका लढविता कशाला? जनतेवर आघात करून आमच्याशिवाय पर्याय नसल्याचे हे सरकार दाखवून देत आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.