Vidhan Sabha 2019 : रणधुमाळी टिपेला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

मतदारसंघनिहाय प्रमुख उमेदवार
कोथरूड - चंद्रकांत पाटील (भाजप), किशोर शिंदे (मनसे) 
कसबा - मुक्ता टिळक (भाजप), अरविंद शिंदे (काँग्रेस), 
विशाल धनवडे (शिवसेना बंडखोर), अजय शिंदे (मनसे) 
कॅंटोन्मेंट - सुनील कांबळे (भाजप), रमेश बागवे (काँग्रेस)
पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप), अश्‍विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस) 
हडपसर - योगेश टिळेकर (भाजप), चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस), 
वसंत मोरे (मनसे)
वडगाव शेरी - जगदीश मुळीक (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) 
खडकवासला - भीमराव तापकीर (भाजप), सचिन दोडके (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप), दत्ता बहिरट (काँग्रेस) 
बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी), गोपीचंद पडळकर (भाजप)
इंदापूर - दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस), हर्षवर्धन पाटील (भाजप) 
दौंड - राहुल कुल (भाजप), रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस) 
पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना), संजय जगताप (काँग्रेस) 
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी), 
राजाराम बाणखेले (शिवसेना) 
खेड - सुरेश गोरे (शिवसेना), दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस), 
अतुल देशमुख (भाजप बंडखोर) 
शिरूर - बाबूराव पाचर्णे (भाजप), अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
जुन्नर - शरद सोनवणे (शिवसेना), अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस), आशा बुचके (शिवसेना बंडखोर) 
भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस), कुलदीप कोंडे (शिवसेना), 
आत्माराम कलाटे (शिवसेना बंडखोर) 
मावळ - बाळा भेगडे (भाजप), सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) 
चिंचवड - लक्ष्मण जगताप (भाजप), राहुल कलाटे (राष्ट्रवादीपुरस्कृत) 
पिंपरी - गौतम चाबुकस्वार (भाजप), अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) 
भोसरी - महेश लांडगे (भाजप), विलास लांडे (राष्ट्रवादीपुरस्कृत)

विधानसभा 2019 : पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील २१ विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात आव्हान निर्माण झाले आहे, तर कोथरूड, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, मावळ, खेड आणि चिंचवडमधील लढती आता लक्षवेधक असतील. अखेरच्या टप्प्यात होत असलेले पक्षांतर, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, शह-काटशहाचे राजकारण यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे.

पुणे जिल्हा हा आजवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून युतीने जिल्ह्यात मुसंडी मारली, तर तो पुन्हा मिळविण्यासाठी आघाडीचा प्रयत्न सुरू आहे. शहर- जिल्ह्यात प्रचारासाठी भाजप- शिवसेनेने राष्ट्रीय नेत्यांची फळीच मैदानात उतरविली, तर आघाडीचे विविध नेतेही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभांचा धडाका लावला आहे; तर अन्य घटक पक्षही त्यांची व्होटबॅंक निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

बंडखोरीचा काही ठिकाणी उपद्रव झाल्यामुळे तेथे तिरंगी, चौरंगी लढत होत आहे. प्रचाराचा शनिवार (ता. १९) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील प्रचारावर हुकूमत राखण्यासाठी आता खल सुरू झाला आहे. 
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूडमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे येथे उमेदवार आहेत. विरोधकांनी एकत्र येऊन मनसेचे किशोर शिंदे यांना पाठबळ दिले.

त्यामुळे धास्तावलेल्या भाजपने विशेष यंत्रणा कोथरूडमध्ये कार्यान्वित केली; तर कसब्यात खासदार गिरीश बापट यांच्या बालेकिल्ल्यात महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी जोरदार प्रचार करून लढत तिरंगी केली आहे.

पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या लढतीकडे लक्ष
चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना आव्हान देत असलेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यामुळे या लढतीबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे, तर पिंपरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत, तर भोसरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीपुरस्कृत उमेदवारांतील सरळ लढतीबद्दल कुतूहल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 promotion Politics