Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगर : मेगा भरतीनंतरही काँटे की टक्कर

Siddharth-and-datta
Siddharth-and-datta

विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना भाजपने काँग्रेसमधील नाराजांना फोडून ‘मेगा भरती’ केली. त्यामुळे प्रचंड चुरशीच्या वाटणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी करण्यात भाजपला यश आले. तरीही, काँग्रेस उमेदवाराचा असलेला जनसंपर्क, नातेगोते, यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात जोरदार लढत बघायला मिळणार आहे.

लोकसभेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून शिवाजीनगर मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला आहे. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य १० हजारांनी घटून २९ हजार ५३२ वर आले. त्यामुळे आपण जोर लावला, तर चमत्कार होऊ शकतो, असे काँग्रेसला वाटू लागले. भाजपमध्ये अंतर्गत राजकारणामुळे उमेदवार बदलावा लागला. सध्या भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात सरळ लढत होत आहे. दोघेही प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

या मतदारसंघातील जनवाडी, गोखलेनगर, हनुमाननगर या सेनापती बापट रस्त्याच्या परिसरातील पट्ट्यात बहिरट यांचा मोठा जनसंपर्क आणि मोठ्या प्रमाणात नातीगोती आहेत. त्याचप्रमाणे बोपोडी, खडकी या भागासह झोपडपट्टीमध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. राष्ट्रवादीचीही या भागात ताकद आहे. पण, भाजपने त्यांची यंत्रणा वापरून काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करणाऱ्या औंध, खडकी, बोपोडी, हनुमाननगर, गोखलेनगर, जनवाडी या भागांत सुरुंग लावून नाराजांना फोडले. तसेच, काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरविल्याने काँग्रेसची हवा तयार करण्यात अपयश आले.

मात्र, शिरोळे यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार, त्यासाठी झालेल्या नेत्यांच्या सभा, रोड शोने वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेलाही खिंडार पडल्याने पाषाण, औंध येथे भाजपला फायदा होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक डझनभर नगरसेवक असले, तरी त्यांच्यात नाराजी आहे.

त्यावर जर तुमच्या प्रभागातून काँग्रेसला जास्त मतदान झाले, तर त्याची किंमत २०२२ च्या महापालिका निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशारा पक्षातील नगरसेवकांना दिल्याने त्यांना काम करावे लागत आहे. वंचित बहुजन आघाडी, बसपच्या उमेदवाराने जास्त मते घेतली; तर त्याचा फायदा भाजपला होणार आहे. आप आणि मनसेचा फटका काही प्रमाणात भाजपला सहन करावा लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com