Vidhan Sabha 2019 : वडगाव शेरी : तुल्यबळ उमेदवारांमुळे उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांना जोरदार ‘टशन’ देऊ शकणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होईल. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार सर्वच बाबतीत तुल्यबळ तरी पारंपरिक व नवीन मतदार, नातीगोती व दांडगा जनसंपर्काच्या जोरावर कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

विधानसभा 2019 : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांना जोरदार ‘टशन’ देऊ शकणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होईल. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार सर्वच बाबतीत तुल्यबळ तरी पारंपरिक व नवीन मतदार, नातीगोती व दांडगा जनसंपर्काच्या जोरावर कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रारंभी काँग्रेस, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. परंतु मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या बुरुजाला भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी खिंडार पाडले. या वेळी मुळीक यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळवीत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला. मागील वेळी ऐनवेळी शिवसेनेच्या तिकिटावर लढलेल्या सुनील टिंगरे यांचा विजयाच्या नजीक पोचण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानुसार, या वेळी टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवीत प्रचाराला जोरदार सुरवात केली. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे या विधानसभा मतदारसंघाकडे या वेळी सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

नातीगोती, दांडगा जनसंपर्क, सामान्यांमध्ये सहजतेने मिसळणे व प्रश्‍नांची जाण यामुळे टिंगरे यांची बाजू भक्कम दिसत आहे. मुळात, राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा ग्रामीण व शहरी वस्त्यांमधील मतदार ही टिंगरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यातच मागील निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढविणारे नारायण गलांडे यांचीही टिंगरे यांना साथ मिळाली आहे. परंतु माजी आमदार बापू पठारे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला दगाफटका करीत भाजपमध्ये प्रवेश मिळविल्याने टिंगरे व राष्ट्रवादीच्या चिंतेत भर पडली आहे. मतदारसंघातील प्रश्‍न सुटले नसले, तरी मुळीक यांनी कार्यकर्ते मात्र जोडले. विशेषतः पठारे यांचा भाजप प्रवेश करवून आपली राजकीय चुणूक त्यांनी दाखवून  दिली. विश्रांतवाडी, नागपूर चाळ, येरवडा यासह वस्त्यांमध्ये राहणारी आरपीआयची व्होटबॅंक व शिवसेनेला मानणारा मतदार आपल्याकडे वळविल्यास मुळीक यांना फायदा होण्याची शक्‍यता आहे.तर दुसरीकडे ‘एमआमएम’चे डॅनियल लांडगे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड, ‘आप’चे गणेश ढमाले व बसपचे राजेश बेंगळे यांच्यासह अपक्ष उमेदवार काही प्रमाणात मते घेण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 vadgav sheri politics