

MDH26B05411
केवड (ता. माढा) : येथे कोरडे पडलेले सीना नदीचे पात्र.
MOH26B03490
मोहोळ : तालुक्यात पाण्याअभावी चिपाड झालेला ऊस.
लोगो : माळशिरस तालुका
केवळ ३५४ हेक्टरवर पेरणी
माळशिरस : नीरा उजवा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या माळशिरस तालुक्यात ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून नीरा उजवा कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बागायती शेतीवर मोठे संकट आले आहे.
सध्या सुळेवाडी, पळसमंडळ, पिंपरी, कदमवाडी, गारवाड, मार्कडवाडी, पठाणवस्ती, जळभावी, कोथळे आणि उंबरे दहिगाव या दहा गावांना दहा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाऊस लांबल्याने अनेक पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या असून अनेक गावांत दिवसाआड किंवा दोन दिवसांआड पाणी सोडले जात आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण १८ हजार हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत केवळ ३५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये मका, बाजरी, तूर आणि काही प्रमाणात उसाचा समावेश आहे. जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ११३ मिलिमीटर असताना चार दिवसांत केवळ ८१ मिलिमीटर पाऊस झाला असून तो ७१.८ टक्के इतका आहे.
दरम्यान, नीरा नदीच्या खोऱ्यातील सर्व धरणे भरण्यासाठी कोकणात चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक कोकणात पाऊस पडावा म्हणून देवाची आराधना करीत आहेत.
लोगो : माढा तालुका
उजनीत वजा २६.०७ टक्के पाणीसाठा
माढा : पावसाळ्याच्या हंगामातच माढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अंजनगाव (खेलोबा) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून वरवडे आणि पडसाळी या गावांनीही टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. उजनी धरणात सध्या वजा २६.०७ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच दिवशी तो ७४.३७ टक्के होता.
धरणातील पाणीपातळी घटल्याने भीमा-सीना जोड कालव्यातून पुढे पाणी सोडणे शक्य नसल्याचे चित्र आहे. तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजनाही बंद असल्याने शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पाच साखर कारखान्यांमुळे उसाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात पावसाअभावी उसासह इतर पिके करपण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २४ हजार ४१ हेक्टर असून मागील वर्षी ४० हजार ६६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सुमारे ३६ हजार हेक्टर पेरणीची अपेक्षा होती. मात्र पावसाअभावी केवळ १०४ हेक्टरवर उडीद आणि ३८ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठा जपण्यासाठी धरण परिसरात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षी सीना नदीच्या पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यातील दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोगो : मोहोळ तालुका
चाऱ्यासाठी पाच हजार रुपये गुंठा ऊस
मोहोळ : गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे तालुक्यात अद्याप एकाही गावाला पाणीटंचाईची झळ जाणवली नसली, तरी चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागात तीव्र होऊ लागल्या आहेत. चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. पाऊस लांबल्याने व्यापक पेरण्या झालेल्या नसून केवळ पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी २५८.६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. त्यामध्ये मका २२६.६ हेक्टर, उडीद १५ हेक्टर, सोयाबीन ९ हेक्टर, मूग २ हेक्टर, तूर १ हेक्टर आणि इतर गळीत धान्य ५ हेक्टरचा समावेश आहे. नरखेड येथे पाणीटंचाईसाठी दोन विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
उजनी डावा कालवा, आष्टी मध्यम प्रकल्प आणि आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र महावितरणकडून दोन ते चार तासच वीजपुरवठा होत असल्याने पाणी असूनही गावोगावी पाणीटंचाई जाणवत आहे. चार साखर कारखाने असलेल्या तालुक्यात ऊस चाऱ्यासाठी पाच हजार रुपये गुंठा दराने तोडला जात आहे.
लोगो : करमाळा तालुका
केळी अन् ऊस लागवड ठप्प
करमाळा : मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने करमाळा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. करमाळा शहरासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत असून घोटी गावात तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरी, बोअरवेल मोठ्या प्रमाणात आटल्या असून जवळपास सर्व तलाव कोरडे पडले आहेत. उजनी बॅकवॉटर परिसरातही तीव्र पाणीटंचाई जाणवत असून केळी व ऊस लागवड जवळपास ठप्प झाली आहे. जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर होणारी ऊस लागवड यंदा पाण्याअभावी थांबली आहे. येत्या आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर अनेक गावांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. मांगी तलावात सध्या केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
लोगो : मंगळवेढा तालुका
३५ हजार हेक्टरवरील पेरणी रखडली
मंगळवेढा : मॉन्सूनने यंदा ओढ दिल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील सुमारे ३५ हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या असून पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र असल्याने शेतकऱ्यांचे डोळे सध्या शासनाऐवजी आकाशाकडे लागले आहेत.
मागील वर्षी विमा कंपनीने कोट्यवधी रुपयांचा पिकविमा हप्ता गोळा केला. मात्र निवडक कांदा उत्पादकांना भरपाई मिळाली असून बाजरी, तूर आणि मका उत्पादकांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. अनेक कांदा उत्पादकांची भरपाई अद्याप रखडली आहे. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून पशुसंवर्धन विभागाने बियाणे उपलब्ध करून दिले असले तरी पाऊस नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. तालुक्यात चार साखर कारखाने असून बागायती भागातील ऊस मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे गाळप हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. छावणीचालकांचे ३८ कोटी रुपये थकीत असल्याने नवीन छावण्या सुरू करण्याबाबत अनिश्चितता आहे. नदीकाठचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला आहे. जलजीवन योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अनेकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
लोगो : सांगोला तालुका
तीन गावांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा
सांगोला : मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने सांगोला तालुक्यात टंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने सुमारे ३० हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या असून कृषी विभागाने नियोजित केलेल्या ४० हजार हेक्टर खरीप क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्र अद्याप पेरणीविना आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ८२ गावांच्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून सध्या २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. कमलापूर, कोळा आणि चिंचोली या तीन गावांना सात टँकरद्वारे दररोज सुमारे साडेतेरा खेपा करून पाणी दिले जात आहे. जूनअखेरपर्यंत पाऊस न झाल्यास आणखी गावांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते.
शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने पेरण्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. पाऊस आणखी लांबल्यास दुबार मशागतीचा खर्च वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा आता आर्द्रा नक्षत्रावर खिळल्या आहेत. तालुक्यातील ऊस, डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट आणि आंबा या फळबागांनाही पाण्याअभावी फटका बसत आहे. विहिरी, कूपनलिका आणि शेततळींची पाणीपातळी घटल्याने बागांना आवश्यक पाणी देणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी फळगळ सुरू झाली असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
लोगो : पंढरपूर तालुका
ऊस, फळबागा संकटात;
गार्डीत टँकरची मागणी
पंढरपूर : पावसाने दडी मारल्याने पंढरपूर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून भीमा नदीही कोरडी पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले ऊस पीक तसेच केळी, डाळिंब आणि द्राक्षबागा संकटात आल्या आहेत. गार्डी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांनी टँकरची मागणी केली आहे.
मागील वर्षी १३ मे ते २४ जून या कालावधीत ११५ ते १२० मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र यावर्षी एल निनोचा प्रभाव दिसून येत असून जून महिन्यात केवळ २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या असून उसाची वाढ थांबल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. खोडवा उसालाही मोठा फटका बसला आहे. शेतीपंपांना पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे. सध्या विहिरी आणि विंधन विहिरींमध्ये काही प्रमाणात पाणी असले तरी वीजपुरवठा सुरळीत नसल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. सोनके-तिसंगी तलावाच्या लाभक्षेत्रातही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ८६४ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या तलावातून आतापर्यंत सुमारे ७५८ दशलक्ष घनफूट पाण्याचा शेती व पिण्यासाठी वापर करण्यात आला आहे. सध्या तलावात केवळ १०६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून ते ३१ ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.