
Pune News : लुटमार भोवली, वाहनतळाची निविदा होणार रद्द
पुणे : कात्रज येथील वाहनतळावर महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लूट करणाऱ्या ठेकेदाराचे काम काढून घेण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे. त्यानुसार ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. तर महात्मा फुले मंडईतील ठेकेदाराने जास्त पैसे घेतल्याची पहिली तक्रार आल्याने त्यास तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पुणे महापालिकेने वाहनतळ चालविण्यासाठी निविदा काढली होती. त्यामध्ये कात्रजसह शहरातील १० वाहनतळ एकाच ठेकेदारास दिले आहेत. महापालिकेने प्रत्येक वाहनतळासाठी दुचाकी, चारचाकीला प्रतितास किती शुल्क घ्यावे हे निश्चीत केले आहे. शुल्क जास्त घेतल्याच्या तक्रार आल्यास पहिल्या दोन तक्रारींसाठी दंडात्मक कारवाई तर तिसऱ्या तक्रारीनंतर थेट निविदा रद्द करून बँक गॅरंटी जप्त केली जाते.
कात्रज येथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे गेल्या आठवड्यात नागरिकांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेण्यात आले. शिवाय वाहनतळाच्या बाहेर पादचारी मार्गावर गाडी लावली तरीही नागरिकांकडून ठेकेदाराने पैसे घेतल्याच्या तक्रारी प्रकल्प विभागाकडे आलेल्या होत्या.
तसेच ‘सकाळ’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या ठेकेदारावर यापूर्वी दोन वेळा कारवाई करून प्रत्येकी ३ हजार आणि ५ हजार रुपयांचा दंड केला आहे. तरीही वाहनतळावर नागरिकांची लूट सुरूच होती. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यात महात्मा फुले मंडईतील आर्यन वाहनतळ ठेकेदारास चालविण्यास देण्यात आले आहे. या ठेकेदाराने ४५ मिनिटांसाठी १० रुपये आॅनलाइन शुल्क घेतल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली. तसेच तक्रारदाराने लूट सुरू असल्याचा प्रकार ‘सकाळ’ च्या निदर्शनास आणून दिला. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता या ठेकेदारास पहिली नोटीस व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, असे सांगितले.
१४ लाख रुपये होणार जप्त
या ठेकेदाराकडे १० वाहनतळाचे काम आहे. त्यासाठी वर्षाला सुमारे ७३ लाख रुपये रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे. या रकमेच्या २० टक्के रक्कम ही बँक गॅरंटी ठेवावी लागत. महापालिकेने केलेल्या करारानुसार ठेकेदाराने कराराचे उल्लंघन केल्यास निविदा रद्द केल्यानंतर गॅरंटींही जप्त केली जाते. त्यानुसार या ठेकेदाराची १४ लाख रुपयांची रक्कम जप्त केली जाणार आहे.
‘‘कात्रज येथील वाहनतळाच्या ठेकेदारा विरोधात यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. यामध्ये कराराचे उल्लंघन झाल्याने निविदा रद्द करून बँक गॅरंटी जप्त केली जाईल.’’
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त