शिरूरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे अचानक थांबले अन्...

नितीन बारवकर
Tuesday, 15 September 2020

शिरूर तालुक्यात एकाही दवाखान्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात नसल्याबद्दल खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे आश्चर्य व्यक्त केले.

शिरूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आज सामान्य माणसाला विनामूल्य उपचार मिळत असताना आणि कोरोनाग्रस्त रूग्णांनाही उपचारकामी दिलासा मिळत असताना, शिरूर तालुक्यात एकाही दवाखान्यात ही योजना राबविली जात नसल्याबद्दल खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे आश्चर्य व्यक्त केले. केवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटललाच नव्हे; तर पन्नास, २५ आणि अगदी दहा-वीस बेडच्या छोट्या रूग्णालयांनी मागणी केली, तरी तेथे ही योजना सुरू करू, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगरहून मुंबईकडे जात असताना मंत्रीस्तरावरील महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झाल्याने, आरोग्यमंत्री टोपे हे शिरूरच्या तहसिलदार कार्यालयात थांबून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. यानंतर, स्थानिक नगरसेवक मंगेश खांडरे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे यांनी त्यांची भेट घेऊन, शिरूर तालुक्यातील कुठल्याच दवाखान्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारकामी दिलासा मिळत नसल्याचा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

त्यावेळी टोपे यांनी तहसिलदार लैला शेख यांच्याकडे तालुक्यातील कुठल्या रूग्णालयात ही योजना चालू आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी एकाही रूग्णालय अथवा दवाखान्यात ही योजना लागू नसल्याची माहिती दिली. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही योजना घेऊ इच्छिणारे रूग्णालय अथवा छोट्या दवाखान्यासाठीच्या निकष व नियमांत शिथिलता आणा, अटी - शर्ती सुलभ करा. या योजनेसाठी केवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच असले पाहिजे, हे बंधन दूर करा. सामान्य लोकांना, गोरगरीबांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी पन्नास, २५ किंवा अगदी दहा-वीस बेड असलेल्या रूग्णालयांनी मागणी केली तरी त्यांना या योजनेत बसवा, अशा सूचना टोपे यांनी दिल्या.

तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलना पत्र द्या, तेथे तातडीने ही योजना सुरू करा, नकार दिल्यास मला कळवा, त्यांच्यावर काय कारवाई करायची हे मी ठरवतो, असा इशारा त्यांनी दिला. तुम्हीही अशा रूग्णालयांची यादी करून त्यांना ही योजना सुरू करण्याबाबत सांगा नकार दिल्यास तुमच्या पातळीवर कारवाई करा, असे तोंडी आदेशही त्यांनी दिले.

तालुक्यात एकाही ठिकाणी ही योजना नाही ही आश्चर्याची बाब आहे. ही योजना मिळावी म्हणून इतरत्र रूग्णालये आमच्या मागे लागतात आणि इथे ही परिस्थिती असेल तर चौकशी करावी लागेल. कोवीड केअर सेंटर मध्ये खासगी डॉक्टरांनी उपचारकामी सहकार्य करावे. त्यांच्याकडून सहकार्य न झाल्यास नोंदणी रद्द होईपर्यंतची कारवाई होऊ शकते, असा गर्भित इशाराही टोपे यांनी दिला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गोरगरीबांवर मोफत उपचार व्हावेत, या हेतूने प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसिलदार लैला शेख यांनी शिरूर तालुक्यातील काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सना पत्र देऊन ही योजना सुरू करण्याबाबत कळविले होते. तथापि, या रूग्णालयांनी शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली. ही योजना नाकारणा-या रूग्णालयांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मात्र, 'हम करे सो कायदा' अशा आविर्भावात वावरणा-या या रूग्णालयांनी या नोटीशीचीही तमा बाळगली नाही. मात्र, आता खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच अशा रूग्णालयांवर कारवाईचे संकेत दिल्याने संबंधित रूग्णालयांचे प्रशासन हादरले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahatma phule janaarogya yojana is not implemented in shirur taluka