मांजरेकरांची भररस्त्यात दादागिरी? गाडीला धक्का लागल्याने मारहाण केल्याचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

गाडीला धक्का लागला म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे- गाडीला धक्का लागला म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार समोर आला आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा पाठीमागून धक्का लागल्यावर मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांकडे दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मराठी- हिंदी चित्रपटातील जेष्ठ कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपणास शिवीगाळ व मारहाण केली. अशी तक्रार कैलास भिकाजी सातपुते (रा. टेंभुर्णी जि. सोलापूर) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून यवत पोलीसांनी मांजरेकर यांच्यावर भा द वि 323, 504 व 506 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 

 'कधी झाडाखाली तर कधी स्टूडिओमध्ये झोपून काढले दिवस'

दि. 15 रोजी रात्री साडे आठ - नऊ च्या सुमारास माजरेकर आपल्या कारमधून चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रात चिंत्रीकरणासाठी जात होते. आगामी 'अंतीम' या चित्रपटाचे दिग्दर्शन मांजरेकर करत आहेत. 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या एका भागाचे चित्रीकरण करण्याचे नियोजन चौफुल्याच्या न्यू आंबिका कला केंद्रात करण्यात आले होते. त्यासाठी ते पुणे सोलापूर महामार्गाने जात होते. य़ा दरम्यान यवतच्या वीज उपक्रेंद्रा जवळ त्यांच्या कारला सातपुते यांच्या कारची मागील बाजूकडून धडक बसली. त्यात मांजरेकरांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले. त्यावरून मांजरेकर यांनी आपल्या थोबाडीत मारून शिवीगाळ, दमदाटी केली असे तक्रारीत म्हटले आहे. सातपुते यांच्या तक्रारीवरून मांजरेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल करण्यात आल्याचे यवत पोलीसांनी सांगीतले.

दरम्यान, महेश मांजरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून शिविगाळ किंवा मारहाण केली नसल्याचं म्हटलं आहे. काही व्यक्तींनी माझ्या गाडीला पाठीमागून धडक दिली. गाडीमध्ये बसलेले तिघेही दारु प्यायले होते. याप्रकरणात पूर्ण मदत करायला तयार असून पोलिस बोलावतील त्यावेळी मी हजर राहिन, असं ते म्हणाले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Manjrekar beats one as car hits Filed a crime with the police