व्हायरल व्हिजिटिंग कार्डवाल्या गिता मावशी आहेत तरी कोण ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

पुणे : महिन्याकाठचं चार हजार रुपयांचं काम गेल्यानं मावशींच्या अर्थात, गीता काळेंच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्या रोज नव्या कामाच्या शोधात असायच्या; पण मावशींना काम मिळालं नाही. त्यांना काम देण्याच्या उद्देशानं त्यांची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी गीता यांचं 'व्हिजिटिंग कार्ड' छापलं. ते मैत्रिणींना व्हॉटसऍपवर पाठवलं. तेव्हाचं 'घर काम मावशी'चं हे 'कार्ड' सोशल मीडियावर व्हायरल झालं अन्‌ गीता सोशल जगतात 'फेमस' झाल्या. गीता यांच्या कार्डवर चर्चा तर रंगलीच; पण दिवसात अडीच हजार फोन, एक हजार मेसेजद्वारे त्यांना कामाच्या 'ऑफर' आल्या. 

विशेष म्हणजे, 'सोशल मीडिया'वरचं व्हिजिटिंग कार्ड पाहून जुन्या मालकाने गीता यांना पुन्हा काम दिलं. बुधवारपासूनच त्यांनी जुन्या ठिकाणी काम करायला सुरवात केली. 

सध्या 'सोशल मीडिया'वर राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच बुधवारी दिवसभर गीता यांच्या नावाचं कार्ड धुमाकूळ घालत होतं. या कार्डवर आधारकार्डसह मोलकरणींच्या पारंपरिक म्हणजे, धुणी-भांडी, झाडू-पोछा, कपडे धुणे, भाकरी करण्याच्या कामाची यादी होती. एवढेच नव्हे, तर कामाचे स्वरूप सांगतानाच त्यासाठीच्या महिन्याकाठच्या पगाराचाही कार्डवर उल्लेख होता. तर मागणीप्रमाणे भाज्या निवडणे, कापणे आणि घराच्या सफाईचीही कामे केली जातील, हेही गीता यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे मावशींचा मोबाईल बुधवारी दिवसभर खणखणत राहिला. कार्डची चर्चा, प्रतिसादनं गीता प्रचंड वैतागल्या आणि त्यांनी आपला फोन बंद केला. त्यावरून व्हायरल 'सत्य की असत्य'याचीही चर्चा रंगली. 

...आणि कार्ड व्हायरलं झालं! 

खासगी कंपनीत काम करणाऱ्या धनश्री शिंदे यांच्याकडे गेली दोन वर्षे गीता घरकाम करतात. आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी गीता करीत असलेली धावपळ पाहून धनश्री त्यांना मदत करतात. त्यांना नवी कामे मिळण्यासाठी धनश्री यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनीच गीता यांच्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड तयार केलं. ते बावधनमधील सोसायट्यांच्या वॉचमनकडे ठेवण्याची कल्पना गीता यांना त्यांनी दिली. हे कार्ड धनश्री यांनी आपल्या मैत्रिणींना शेअर केलं आणि त्यानंतर झपाट्याने 'व्हायरल' झालेल्या या कार्डची सर्वत्र उत्सुकता वाढली. 

''नवे काम हवे असल्याने धनश्रीताईंनी कार्ड तयार केलं आहे. ते अजूनही घरातच आहेत, तरीही खूप फोन येत आहेत. त्याआधीच मला जुनी कामेही मिळाली. आता कोणतेही नवे काम नको. एवढ्या कामावर मुलांचे शिक्षण करेल.''
- गीता काळे, मावशी 

''कार्ड छापण्याचा उद्देश साध्य झाला असून, गीता यांना चांगल्या पगाराचं काम पुन्हा मिळालं आहे. मात्र, एवढ्या प्रमाणात चर्चा होईल, याची कल्पना नव्हती. शंभर कार्ड छापले आहेत. त्यातील एकच कार्ड लोकांपर्यंत पोचले आहे. कार्डवर केवळ बावधन एवढाच उल्लेख असल्याने अन्य राज्यांतूनही फोन येत आहेत.''
- धनश्री शिंदे, मावशींची घरमालकीण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maid Geeta Kale Visiting Card Viral on Social Media