दूध वाढीसाठी बेकायदा ऑक्‍सिटोसीन औषध विक्री करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oxytocin drugs

गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्‍सिटोसीन औषधाची विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीच्या मुख्य सूत्रधारास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या.

दूध वाढीसाठी बेकायदा ऑक्‍सिटोसीन औषध विक्री करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला अटक

पुणे - गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्‍सिटोसीन औषधाची विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीच्या मुख्य सूत्रधारास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या पथकाने ठाण्यातील मुंब्रा परिसरातून त्यास अटक केली.

बाबूभाई उर्फ अल्लाउद्दीन लस्कर (रा. कल्याण, ठाणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपुर्वीच अमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यावतीने लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरामध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी ऑक्‍सिटोसीन औषधाचा साठा करुन त्याचे वितरण करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीला पोलिसांनी पकडले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 53 लाख 52 हजार रुपये इतका साठा जप्त केला होता.

दरम्यान, या प्रकरणात समीर अन्वर कुरेशी (वय 29, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजीत सुधांशु जाना (वय 44, रा. पुरबा बार, विलासपुर, पुरबा मदीनीनपुर, पश्‍चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय 27, तिराईपूर, पश्‍चिम बंगाल), सत्यजीत महेशचंद्र मोन्डल (वय 22, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्‍चिम बंगाल), श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय 32, रा. नलपुरकुर, मंडाल, पश्‍चिम बंगाल) यांना अटक केली होती.

दरम्यान, पोलिसांकडून या टोळीच्या मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये मुंब्रा येथील बाबूभाई लस्कर हा या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचे उघडकीस आले होते. आरोपींना पकडल्याची खबर मिळाल्यामुळे लस्कर हा पसार झाला होता. दरम्यान, तो पुन्हा मुंब्रा येथे आला असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यास मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातुन अटक केली.

सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधे, सचिन माळवे, विशाल दळवी, राहुल जोशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

औषधनिर्माण कंपनीती अनुभवाचा उपयोग गैरकामासाठी

बाबूभाई लस्कर हा कलकत्ता येथील एका औषधनिर्माण कंपनीमध्ये नोकरीला होता. तेथे काही वर्ष काम केल्यानंतर त्याने नोकरी सोडली. दरम्यान, तेथे घेतलेल्या अनुभवाचा उपयोग करुन तो अशा पद्धतीने ऑक्‍सीटोसीनची निर्मिती करीत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

टॅग्स :crimeMilkArrested