बळीराजा म्हणतोय, पावसानं झोडपलं, जगायचं कसं? 

जयराम सुपेकर
Monday, 7 September 2020

बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील सर्वच शेतकऱ्यांची स्थिती सध्या अशी झाली नाही. रविवारी रात्री जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्‍यातील सुपे व परिसरातील उभी पिके भूईसपाट झाली.

सुपे (पुणे) : चार एकरांत दोन वेळा पेरलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले. आता आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आणखी पाऊस झाला तर शेतीचे मोठे नुकसान होईल. आधीच टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यात आता हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे जमीनदोस्त होत आहेत. शेतकऱ्यांनी जगायचे कसे, अशी प्रतिक्रिया बारामती तालुक्‍यातील बोरकरवाडीच्या हरिश्‍चंद्र बोरकर यांनी व्यक्त केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील सर्वच शेतकऱ्यांची स्थिती सध्या अशी झाली नाही. रविवारी रात्री जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्‍यातील सुपे व परिसरातील उभी पिके भूईसपाट झाली. पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सुपे परिसरात रात्री दोन तासांत सुमारे 110 मिमी पावसाची नोंद झाली. यंदा खरीपातही पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकऱ्यांनी उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. मात्र, वादळी पावसामुळे ऊस, हातातोंडाशी आलेली बाजरी, मका, चाऱ्याची पिके जमीनदोस्त झाली. मेथी, कोथींबिर, कांदा तसेच, डाळिंबाची फळे गळून मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय, तेच उगवलंय

पावसामुळे अनेक भागात वीज खंडीत झाली. गिरण्या, घरगुती जलशुद्धीकरण यंत्र बंद राहिल्याने गैरसोय झाली. काऱ्हाटीत घनश्‍याम पवार यांच्या एक एकर सेंद्रिय उसाचे नुकसान झाले. बाळासाहेब वाबळे यांचा काढणीला आलेला मका लोळला. दादा पाटील- कुतवळ, बापूराव चोरमले, गणेश गायकवाड यांचा ऊस भूईसपाट झाला. 

कोथींबिरीच्या व्यवहाराची कालच व्यापाऱ्याबरोबर बोलणी झाली होती. परंतु, रात्री झालेल्या पावसामुळे कोथींबिरीचे किमान दोन लाखांचे नुकसान झाले. चार पैसे मिळतील, या आशेने केलेला भाजीपाला मातीमोल झाला.
 - हरिश्‍चंद्र बोरकर, मधुकर बोरकर, बोरकरवाडी (ता. बारामती)   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major damage to crops due to rains in Supe area