मेजर राणे यांचे परमवीरचक्र पत्नीकडून बाँबे सॅपर्सच्या स्वाधीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

दिवंगत मेजर राणे यांचे शौर्य
मेजर राणे यांनी भारत आणि पाकच्या १९४८ च्या युद्धात राजौरी येथे मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या शौर्याबद्दल ८ एप्रिल १९४८ रोजी त्यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते. १९६८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. १९९४ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी पुण्यात त्यांचे निधन झाले.

पुणे - लष्करातील अतुलनीय पराक्रमाबद्दल दिवंगत मेजर रामा राघोबा राणे यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते. हा सर्वोच्च सन्मान जिवंतपणी मिळालेले ते पहिलेच अधिकारी. त्यांच्या मृत्यूपश्‍चात जपलेली ही शौर्याची स्मृती त्यांच्या पत्नीने शनिवारी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याकडे बहाल केली. हे पदक आता बाँबे सॅपर्समध्ये ठेवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पतीच्या आठवणींना उजाळा देत हा आठवणींचा ठेवा लष्करप्रमुखांकडे सुपूर्त करताना राजेश्‍वरी राणे यांना गहिवरून आले. हे पदक घरात ठेवण्यापेक्षा लष्कराच्या दरबारात राहिले तर अधिकारी, जवानांना त्यातून प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 
लष्करी अभियांत्रिकी सेवेत मोलाची कामगिरी करणाऱ्या बाँबे सॅपर्सच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राणे यांनी हे पदक नरवणे यांच्या स्वाधीन केले. या वेळी बाँबे सॅपर्सचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यू, लेफ्टनंट जनरल संजीवकुमार श्रीवास्तव, ब्रिगेडियर एम. जी. कुमार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी लष्करप्रमुख नरवणे यांनी हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

पुणे : ... अन् पोलिसांच्या मदतीने महिलांनी रोखला बालविवाह!

त्यानंतर त्यांनी पथसंचलनाची मानवंदना स्वीकारली. या वेळी लष्करी जवानांनी दिमाखदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली. सुखोई ३० या लढाऊ विमानाने सलामी देत मानवंदना दिली. नरवणे म्हणाले, ‘‘देशाप्रती कर्तव्याची भूमिका बजावत ज्या सैनिकांनी प्राणांची आहुती दिली, त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. बाँबे सॅपर्स मेहनत घेत भारतीय लष्कराचे आणि देशाचे नाव उंचावत आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major Ranes paramvirchakra by wife to the Bombay Sappers