Pune News : भारताला विकसित राष्ट्र करण्याच्या केवळ वल्गना - पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ः कै. धनंजय थोरात स्मृती पुरस्कारांचे वितरण
make India developed nation congress Prithviraj Chavan politics marathi news
make India developed nation congress Prithviraj Chavan politics marathi newsEsakal
Updated on

पुणे : देशात सध्या भारताला विकसित राष्ट्र बनविण्याबाबतच्या केवळ वल्गना केल्या जात आहेत. प्रत्यक्षात भारताचे चित्र फार वेगळे आहे. देशाची वाटचाल ही विकसित राष्ट्राकडे नसून भलतीकडेच सुरु असल्याचे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता.१८) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले.

समाजाच्या उन्नतीसाठी आणि सामाजिक बदल घडविण्यासाठी यापुढे केवळ राजकीय पक्षांवर व नेत्यांवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे सामाजिक बदलांसाठी आवश्‍यक बाबींवर निर्णय घेण्याबाबत सरकारला भाग पाडण्यासाठी सामाजिक संस्थांनाही वेळोवेळी आपली मते व्यक्त करत, निर्णय प्रक्रियेत खारीचा वाटा उचलावा लागेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कॉग्रेसचे दिवंगत कार्यकर्ते धनंजय थोरात स्मृती मित्र मंडळाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ गायक पंडित सत्यशील देशपांडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, कै. धनंजय थोरात यां; कच्या पत्नी शुभांगी थोरात आणि पुरस्कारांचे मानकरी व्यासपीठावर उपस्थित होते. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या समारंभात सन २०२२ व २०२३ या दोन वर्षाचे दरवर्षी प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या दोन्ही वर्षातील प्रत्येकी एक रोख २५ हजार रुपयांचा मुख्य पुरस्कार अनुक्रमे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि लातूर येथील सेवालय संस्थेचे संस्थापक रवी बापटले यांना तर,

प्रत्येकी रोख ११ हजार रुपयांचा पुरस्कार अनुक्रमे तबलावादक पांडुरंग मुखडे, कोरोना संसर्गाच्या काळात मृत कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराचे काम करणारे जावेद खान (२०२२) आणि शेल्टर असोसिएट्सच्या संस्थापिका प्रतिमा जोशी, संगीत दिग्दर्शक राहुल रानडे (२०२३) यांना प्रदान करण्यात आला.

चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘ कै. ‘धनंजय थोरात हे काँग्रेसचे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते होते. त्यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या रूपाने समाजात आडवळणी राहून लोकसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम प्रशंसनीय आहे.

आपण देशाची प्रगती झाली पाहिजे, दारिद्र्य, निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशा अपेक्षा व्यक्त करत असतो. परंतु सध्या या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत.त्यामुळे केवळ राजकीय पक्षच बदल घडवतील, असे समजू नका. यासाठी सामाजिक, नागरी संस्था व संघटनांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे.’’

यावेळी मोहन जोशी, पंडित सत्यशील देशपांडे आणि पुरस्कारांचे मानकरी विवेक वेलणकर, रवी बापटले, राहुल रानडे, जावेद खान, पांडुरंग मुखडे यांनीही मनोगत व्यक्त केले. उल्हास पवार यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. रामदास फुटाणे यांनी आभार मानले.

`सोनिया गांधींमुळे माहिती अधिकार कायदा’

देशात माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्यावेळी मी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री होतो. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध होता. यामुळे मंत्र्यांना काम करता येणार नसल्याचा पवित्रा या मंत्र्यांनी घेतला होता.

परंतु कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ मंत्र्यांचा विरोध डावलून या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला आणि गांधी यांच्यामुळेच हा कायदा अमलात येऊ शकला, अशी आठवण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prithviraj Chavan statement Missing Link
Political Use of Cooperative Sector Under Fire as Prithviraj Chavan Demands Reform
Made-in-India Nathu-La Server Developed
Karad Krishna Sugar Factory election latest updates
Marathi News Esakal
www.esakal.com