वाहतूक सुलभीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेणार - अशोक चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

 ""मुंबई-पुणे महामार्गाप्रमाणे राज्यातील मुख्य ट्रॅफिक जंक्‍शनवर सुविधा देण्याबरोबरच वाढते नागरिकीकरण व सुलभ वाहतूक यांचा समन्वय राखण्यासाठी पुढील 15 ते 20 वर्षांकरिता रस्ते, उड्डाण पूल उभारणीबाबत व्यापक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेणार आहे,'' असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

पुणे - ""मुंबई-पुणे महामार्गाप्रमाणे राज्यातील मुख्य ट्रॅफिक जंक्‍शनवर सुविधा देण्याबरोबरच वाढते नागरिकीकरण व सुलभ वाहतूक यांचा समन्वय राखण्यासाठी पुढील 15 ते 20 वर्षांकरिता रस्ते, उड्डाण पूल उभारणीबाबत व्यापक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेणार आहे,'' असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंता परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी चव्हाण बोलत होते. या वेळी विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकाम) अजित सगणे, मुख्य अभियंता (पुणे) सदाशिव साळुंखे, मुख्य अभियंता (नागपूर) उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग व राज्यातील प्रादेशिक बांधकाम विभागांचे वरिष्ठ अभियंता उपस्थित होते. 

प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे, तसेच कोर्ट कचेऱ्यांमुळे रखडलेल्या कामांचा आढावा घेऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी निर्णय घेत असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, ""वित्तीय संस्था, बॅंका यांच्या माध्यमातून अधिक पत निर्माण करून निधी उपलब्ध करणे, अर्थसंकल्प, नाबार्डकडून विभागाला अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक दर्जेदार, टिकाऊ रस्ते बांधणीसाठी ध्येय, गुणवत्ता आणि सातत्य या त्रिसूत्रीवर आधारित कामे करण्यावर बांधकाम विभाग भर देणार आहे.'' 

नागरिकांची गरज लक्षात घेता मुंबई-पुणे महामार्गाप्रमाणे सोयी, सुविधा देण्याबरोबरच ट्रक टर्मिनल उभारणे, महामार्ग सुशोभीकरण, देखभाल-दुरुस्ती यांवर अधिक भर देण्यात येईल. कामांची गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी विभागाची कार्य संस्कृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांची वेळेत, प्रभावी व टिकाऊ अंमलबजावणीसाठी आर्किटेक्‍चर विभाग, पार्क-गार्डन विभाग, यांत्रिकी विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग यांचा समन्वय राखण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

बांधकाम विभागाचे सचिव ए. ए. सगणे यांनी आपल्या भाषणात अभियंत्यांच्या परिषदेच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान व कार्यप्रणाली यांची सर्व प्रादेशिक विभागांना आदान-प्रदान झाल्यामुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल, असे सांगितले. या वेळी पुलांची देखभाल करण्याबाबत तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्त झाले. कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make strategic decisions to facilitate transportation