बारामतीत : माळेगावकरांनी घेतला ऐतिहासिक निर्णय; तालुक्यातून होतेय कौतूक 

कल्याण पाचांगणे
Monday, 4 January 2021

माळेगाव बुद्रूक नगरपंचायतीचा विजय असो...अशी घोषणाबाजी करीत या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सर्व ७६ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

माळेगाव : माळेगाव बुद्रूक नगरपंचायतीचा विजय असो...अशी घोषणाबाजी करीत या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सर्व ७६ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. याचाच अर्थ बारामती तालुक्यात माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीची निवडणूक नको, असे स्पष्ट संकेत गावकऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

दुसरीकडे, माळेगाव खुर्द ग्रापंचायतीची पंचावर्षिक निवडूक बिनविरोध करण्यात तेथील गावकऱ्यांना यश आले.  तालुक्यात राजकिय दृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक मोठ्या असलेल्या दोन्ही गावात उमेदवारांसह गावकऱ्यांनी विकासाला अधिक महत्व देत निर्णयाक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. परिणामी तालुक्यात संबंधित पदाधिकाऱ्यांचे कौतूक होत आहे. हे विशेष होय.

बारामती तालुक्यात माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहिर होण्याच्या केवळ तीन दिवस आगोदर शासनाने या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया जाहिर केली. याकामी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शासनाच्या नगविकास खात्याने या ग्रामपंचायतीची निडणूक रद्द होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे शिफारस केली होती. परंतू तांत्रिकदृष्ट्या व नियमानुसार निवडणूक आयोगाला ग्रामपंचायत निवडणूक रद्द करता आली नाही. सहाजिक या प्राप्त स्थितीमुळे इच्छुक उमेदवारांसह गावपातळीवरील नेतेमंडळी संभ्रमात पडली होती. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर साधारणतः दोन महिन्यातच नगरपंचायतीच्या निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे कोणालाच दोन निवडणूकीचा खर्च परवडणारा नव्हता. ही बाब विचारात घेवून सत्ताधारी, विरोधक आणि गावपतळीवरील ज्येष्ठ नेतेमंडळींनी निर्णायक भूमिका घेत ग्रामपंचायतीची निवडणूक नाकारण्याचा निर्णय घेतला.

त्यामध्ये सर्व ७६ उमेदवारांना विश्वासात घेत संबंधित नेते मंडळींनी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. त्यामध्ये माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे, माजी संचालक दिपक तावरे, दत्तात्रेय येळे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे, विक्रमसिंह जाधवराव, दिलीप तावरे, संजय भोसले, अॅड. राहुल तावरे, रणजित अशोक तावरे, जयदीप तावरे, रविराज तावरे, शकिल सय्यद, प्रशांत मोरे, शौकत शेख, प्रमोद जाधव, शिवराज जाधवराव, अशोक सस्ते, किशोर तावरे,  प्रमोद तावरे, प्रदिप जाधव, नितीन तावरे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान, माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायचे नगपंचायतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. अर्थात ही प्रक्रिया पुर्णत्वाला येईपर्यंत या गावात प्रशासकांनाच काम पहावे लागणार आहे. त्यामुळे शासनाकडून नगरपंचायतीची प्रक्रियेला अंतिम स्वरूप देवून नगर पंचायतीची निवडणूक घेण्यासंबंधी येथील नेते मंडळी प्रयत्न करणार आहे, याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे, अशी माहिती दिपक तावरे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गावाचा सर्वांगिण विकास आणि शांतता या गोष्टींना अधिक प्रधान्य देत खरेतर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले उमेगवारी अर्ज मागे घेतले. अर्थात त्यांचा निवडणूक नाकारण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे संबंधितांना मनापासून धन्यवाद देतो.-बाळासाहेब तावरे, माळेगाव कारखाना अध्यक्ष   

भारतात बनलेली लस जगभरात जाईल व अनेकांचे प्राण वाचवेल

आमची पार्टी जरी राष्ट्रवादीच्या विरोधात असली,तरी ज्यावेळस गावाच्या विकासाचा मुद्दा पुढे येईल त्यावेळस राजकारण न करता आम्ही सहकार्य़ाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे माळेगावकरांनी ग्रामपंचायतीची निवडणूक नाकारून खरेतर गावाचा नावलौकीक वाढविला आहे.-रंजन तावरे, माळेगाव करखाना माजी अध्यक्ष  

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malegaon Budruk All 76 aspiring candidates withdrew their nomination papers