

Malegaon DP Plan Protest
sakal
माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यावरून (डीपी प्लॅन) गावात बाधित शेतकरी, ग्रामस्थ विरुद्ध प्रशासन असा संघर्ष उफाळून आल्याचे आज दिसून आले. बहुसंख्य माळेगावकरांनी नगरपंचायत, नगरविकास व महसूल प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका मांडली. प्रारूप आराखडा तत्काळ रद्द करा आणि गावकऱ्यांना विश्वासात घेऊन नव्याने आराखडा तयार करावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित बारामती तहसीलदारांपुढे लावून धरली. “शेतकऱ्यांच्या जमिनींवर अन्यायकारक आरक्षण आम्हाला मान्य नाही”, “ प्रारूप जाहिर झालेला विकास आराखडा रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, ” अशा घोषणा देत आदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला. माळेगावकरांनीही बाजारपेठ, दुकाने, व्यवहार पूर्णतः बंद ठेवत शेतकऱ्यांना पाटींबा दिला.