जिल्हा परिषद माळीनगर गट वार्तापत्र
लोगो : माळीनगर जि. प. गट
---
माळीनगर गटात तिरंगी लढतीची शक्यता
भाजप, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांत उमेदवार निवडीसाठी जोरदार हालचाली
मिलिंद गिरमे : सकाळ वृत्तसेवा
लवंग, ता. २० : माळशिरस तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांत तिरंगी सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेचा माळीनगर गट हा तालुक्याच्या पूर्व भागात येत असून, या भागातील गावे मोहिते- पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात. आतापर्यंत झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये माळीनगर गटातून नेहमीच मोहिते- पाटील गटाचा उमेदवार निवडून आला आहे.
यंदा मात्र, राज्यात भाजपने विविध महापालिका, नगरपरिषदा व नगरपालिकांमध्ये मोठी मुसंडी मारल्याने राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी गट-गणांतून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून सखोल चर्चा सुरू केल्या आहेत.
शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, तालुक्याचा सखोल अभ्यास असलेले नेते जयसिंह मोहिते- पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते- पाटील यांच्यात उमेदवार निवडीबाबत मंथन सुरू आहे.
दरम्यान, वेळापूर येथील आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यावरही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन योग्य उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाजपकडून मांडवे येथील माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगल्यावर बैठका होत असून, पालकमंत्री गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली जात आहे.
तसेच प्रतापगडावर डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमधून नाराज होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले के. के. पाटील, सोमनाथ वाघमोडे, अतुल सरतापे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर उमेदवार निवडीबाबत चर्चा सुरू आहे.
मात्र आजपर्यंत कोणत्याही पक्षाने संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर न करता गोपनीयता राखली आहे. उद्या (बुधवारी) फॉर्म भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने, इतर लहान-मोठ्या पक्षांसह या तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असतील, याचे चित्र आजच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज्यात भाजपची वाढती ताकद पाहता, भाजप वगळता इतर सर्व पक्ष ही निवडणूक आपल्या राजकीय अस्तित्वाची मानून अत्यंत ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे तालुक्यात सुरू असलेल्या बैठकांवरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत मोहिते- पाटील गट आणि विरोधक यांच्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मोहिते- पाटील गटानेच सत्ता काबीज केल्याचा इतिहास आहे. मात्र, सध्याची बदलती परिस्थिती लक्षात घेता, अकलूज नगर परिषद जरी मोहिते- पाटील गटाने ताब्यात घेतली असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सावध पावले टाकली जात असल्याचे चित्र आहे.
महाळुंग व अकलूज नगर परिषद झाल्यानंतर यशवंतनगर व माळेवाडी गावांचा अकलूज नगर परिषदेत समावेश झाल्याने माळीनगर गटालगतची गावसंख्या कमी झाली आहे. सध्या माळीनगर गटात माळीनगर व लवंग असे दोन पंचायत समिती गण असून, या गणांमध्ये एकूण दहा गावे येतात. भाजप ताकदीने मैदानात उतरत असल्याने सर्वच गणांत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
---
माळीनगर गटातील गावे
माळीनगर गण : माळीनगर, खंडाळी, सवतगव्हाण, बिजवडी.
लवंग गण : लवंग, तांबवे, गणेशगाव, वाघोली, संगम, बाभूळगाव, वाफेगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

