सुरुंगाच्या स्फोटाचा जमीन, फळझाडांना फटका

सुरुंगाच्या स्फोटाचा जमीन, फळझाडांना फटका
Published on: 

कवठे येमाई, ता. ४ : मलठण (ता. शिरूर) येथे स्टोन क्रशरच्या सुरुंगाच्या स्फोटामुळे (ब्लास्टिंग) तसेच उडणाऱ्या धुळीमुळे शेतजमीन, हजारो फळझाडांसह जमिनीच्या संरक्षण कुंपणाचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी स्टोन क्रशर व्यावसायिकांवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी खासगी बांधकाम व्यावसायिक विलास थानमल पालरेषा यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासनाकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
मलठण परिसरातील स्टोनक्रशर व खाणपट्ट्याच्या कामांमुळे ध्वनी व वायुप्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे पालरेषा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी करून लक्ष वेधले होते. मात्र, दखल न घेतल्याने स्मरणपत्र देत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाईची मागणी केली आहे.
पालरेषा यांची मलठण परिसरात जमीन असून तेथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच काही भागात ते शेती करतात. त्यांच्या जमिनीलगत असलेल्या भाऊसाहेब पाचंगे यांच्या भाग्यलक्ष्मी स्टोन क्रशरमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जमिनीचे संरक्षण कुंपण कोसळले असून जमीन खचली आहे. क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे आंबा, पेरू, चिकू, जांभूळ यांसह हजारो फळझाडांचे नुकसान झाले आहे. ब्लास्टिंग करताना सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने नजीकच्या जमिनीला भेगा पडल्या आहेत.
नियमांचे उल्लंघन करून उत्खनन होत असून पाण्याचा पुरेसा वापर केला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उधळत आहेत. तसेच वाहतूक करत असताना आवश्यक काळजी घेतली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उधळत असल्याचे पालरेषा यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित परवानग्या, पर्यावरणीय अटी आणि त्यांचे पालन यांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासन ‘कागदी घोडे’ नाचविण्यात व्यग्र !
मलठण परिसरातील स्टोन क्रशरबाबत बांधकाम व्यावसायिक विलास पालरेषा यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस प्रशासनाकडे गेल्या दोन वर्षांपासून वारंवार तक्रारी
केल्या आहेत. मात्र, त्याची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. याबाबत प्रशासन ‘कागदी घोडे’ नाचविण्यात व्यग्र आहे.

क्रशरबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून संबंधितांना नोटीस बजावली आहे. खाणपट्टा आदेशातील अटी-शर्तींचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा खाणपट्टा सील करण्यात येईल, अशा लेखी सूचना दिल्या आहेत.
- बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरूर

सर्व शासकीय विभागांच्या आवश्यक परवानग्या घेऊन खाणपट्टा सुरू आहे. नियम व अटींचे काटेकोर पालन केले जात आहे. झाडांचे कोणत्याही प्रकारे नुकसान झालेले नाही. क्रशरसाठी २००६ मध्येच परवानगी मिळालेली असून, त्यावेळी लगत कोणतेही रहिवासी क्षेत्र अस्तित्वात नव्हते. त्यानंतर पालरेषा यांना २०२१ मध्ये रहिवासी क्षेत्रासाठी परवानगी मिळाली आहे. क्रशरला पूर्वीच परवानगी देण्यात आलेली असताना त्यालगत नंतर रहिवासी क्षेत्राला परवानगी देणे अपेक्षित नव्हते.
- भाऊसाहेब पाचंगे, भाग्यलक्ष्मी स्टोन क्रशर, मलठण


02141

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com