पुरुषही ठरताहेत कौटुंबिक वादाचे बळी! | Family Dispute | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man
पुरुषही ठरताहेत कौटुंबिक वादाचे बळी!

पुरुषही ठरताहेत कौटुंबिक वादाचे बळी!

पुणे - खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या समीरचे (नाव बदललेले) किरकोळ कारणावरून पत्नीसमवेत वाद झाल्याने ती माहेरी निघून गेली. पत्नीने परत घरी यावे, यासाठी सर्व प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. त्यानंतर हा कौटुंबिक वाद पोलिसांसमोर मांडला. पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मधील अधिकाऱ्यांनी समीर व त्याच्या पत्नीचे समुपदेशन केले. त्यानंतर अडखळलेली त्यांच्या संसाराची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली! याप्रकरणावरून केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही कौटुंबिक वादाचे बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांत एक हजारांहून अधिक पुरुषांच्या याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहे.

लग्नानंतर महिलांना पती व सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जातो. मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून महिला पोलिसांकडे दाद मागतात. पोलिस ठाण्यांमध्ये न्याय न मिळाल्यास महिला ‘भरोसा सेल’अंतर्गत येणाऱ्या महिला सहाय्यता कक्षाकडे तक्रार अर्ज देतात. तर काही महिला राज्य व राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागतात. मात्र, महिलांप्रमाणे अनेकदा पुरुषांनाही कौटुंबिक वाद-विवादाला सामोरे जावे लागते. घरामध्ये किरकोळ कारणावरून होणाऱ्या भांडणांमधून अनेकदा प्रकरण काडीमोड घेण्यापर्यंत पोचते.

पत्नी, तिचे आई-वडील व अन्य नातेवाईकांकडून कुटुंबात होणारी ढवळाढवळ व त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाविरुद्ध अखेर पतीही पोलिसांकडे दाद मागतात. पुणे पोलिसांच्या महिला साहाय्यता कक्षाकडे महिलांप्रमाणे पुरुषही तक्रारअर्ज दाखल करून आपली कैफियत मांडत असल्याची सद्यःस्थिती आहे. मागील दोन वर्षांत महिला या कक्षाकडे एकूण ४ हजार ५१८ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये महिलांचे ३ हजार ४६७ अर्ज, तर पुरुषांचे १ हजार ५१ इतके अर्ज होते. महिलांच्या तुलनेत पुरुषांचे अर्जांचे प्रमाण १० ते २० टक्के आहे.

असे होते समुपदेशन

महिला साहाय्यता कक्षाकडे महिलांप्रमाणेच पुरुषांचेही तक्रार अर्ज येता. संबंधित अर्जाची पडताळणी केली जाते. त्यानंतर पोलिसांकडून संबंधितांना एकत्र आणून त्यांचे समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाते, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही योग्य प्रकारे समज दिली जाते. त्यांचे वाद मिटल्यानंतरही पुढील सहा महिने त्यांचा संसार कसा सुरू आहे, याबाबत साहाय्यता कक्षाकडून आढावा घेतला जातो.

दोन वर्षांत एक हजारहून अधिक तक्रारी

  • महिला साहाय्यता कक्षाकडून समुपदेशन

  • अशा आहेत पुरुषांच्या तक्रारी...

  • किरकोळ कारणांवरून सातत्याने भांडणे

  • एकत्र कुटुंबासमवेत राहाण्यास होणारा विरोध

  • घटस्फोट घेण्यासाठी सातत्याने त्रास देणे

  • वाद मिटवून पत्नीने घरी परतावे

आमच्याकडे महिलांप्रमाणे पुरुषांचेही तक्रारअर्ज येतात. अनेकदा किरकोळ कारणांवरून वादाच्या घटना घडतात. त्याबाबत पुरुष आपल्या पत्नीविरुद्ध तक्रारअर्ज देतात. संबंधित अर्जाची पाहणी करून दोघांना समोरासमोर आणून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर बहुतांश प्रकरणांमधील वाद संपुष्टात येतात.

- राजेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

loading image
go to top