म्हसवे गटात वसंतराव मानकुमरेच निश्चित पण निष्ठावंत व ओबीसीत नाराजी

म्हसवे गटात वसंतराव मानकुमरेच निश्चित पण निष्ठावंत व ओबीसीत नाराजी

Published on

मानकुमरेंना खिंडीत गाठणार म्‍हसवे गट?

भाजपने उमेदवारी दिली, तरी विरोधाची धार ठरवणार निर्णय

भाऊसाहेब जंगम : सकाळ वृत्तसेवा
हुमगाव, ता. १७ : जावळीतील म्हसवे जिल्हा परिषद गटात भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच भाजपच्या निष्ठावंतांचा तसेच ओबीसी समाजबांधवांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे गाव याच गटात येत असल्याने आमदार शिंदेंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
म्हसवे जिल्हा परिषद गट हा ओबीसीसाठी राखीव आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासूनच मानकुमरे समर्थकांकडून कुणबी दाखल्याच्या आधारे मानकुमरे हेच भाजपकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे आणि मानकुमरे हे जावळीच्या राजकारणातील मातब्बर नाव असल्याने मूळ ओबीसीतील कुणाचीही त्यांच्याशी थेट लढण्याची हिम्मत नसल्याने अनेकांनी आपली महत्त्वाकांक्षा दाबून ठेवलीय. यापूर्वी त्यांनी दोनदा या गटातून प्रतिनिधित्व करत जिल्हा परिषद उपाध्यक्षपद व शिक्षण व अर्थ समितीचे सभापतिपद मिळवले आहे. त्यामुळे त्यांनी आता थांबावे, अशी भाजपमधील निष्ठावंतांची इच्छा आहे, तर म्हसवे गटात ओबीसींचे अडीच ते तीन हजार मतदान असून, ते निर्णायक असून देखील आजअखेर ओबीसींना या उमेदवारीसंदर्भात कुणीही विचारात न घेतल्याने ओबीसीत मोठी नाराजी आहे. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांकडून ओबीसींना उमेदवारीसंदर्भात गळ घातली जात असतानाच ओबीसीतील इच्छुकांना भाजपसोबतच जाण्याची इच्छा असल्याने ते हतबल आहेत. मानकुमरेंबरोबरच वहागावच्‍या महिला सरपंचांचे पती संतोष शिराळे हे भाजपकडून, तर अशोक चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असल्याचे समजते. मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदेंनी हुमगाव येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करून भाजपविरोधात सर्वपक्षीयांची मोट बांधण्याचे संकेत दिले होते. मात्र, वसंतराव मानकुमरे व आमदार शशिकांत शिंदे हे कायमच एकमेकांना पूरक भूमिका घेत असल्याचे आजवर दिसून आले आहे. खुद्द मानकुमरेंनीही हे सख्य जाहीरपणे मान्य केले आहे. त्यामुळे आमदार शिंदे मानकुमरेंविरोधात तगडा उमेदवार देतील का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
.........................................
म्‍हसवे, खर्शी बारामुरे गणांसाठी...
म्हसवे गटांतर्गत खर्शी बारामुरे व म्हसवे हे दोन गण येतात. पैकी म्हसवे गण हा महिलेसाठी राखीव असल्याने या ठिकाणाहून भाजपकडून माजी सभापती अरुणा शिर्के यांच्यासह रेश्मा पोफळे, पूनम भालेघरे या इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीकडून मितल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
खर्शी बारामुरे हा गण सर्वसाधारण पुरुष म्हणून राखीव असून, पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षणही हेच असल्याने या गणात इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळते. भाजपकडून माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्यासह मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे स्वीय सहाय्यक नितीन गावडे हे दोन प्रबळ दावेदार आहेत, तर राष्ट्रवादीकडून आमदार शिंदे यांचे विश्वासू माथाडी नेते विठ्ठल गोळे, गोपाळ बेलोशे ही नावे आघाडीवर आहेत.
...........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com