बिबट्याच्या हल्ल्यातून मेंढपाळ वाचला; मात्र शेळीची शिकार केली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest Employee

मंचर शहराच्या पूर्वेला मुळेवाडी रस्त्यालगत शुक्रवारी गुरांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गायीला गंभीर जखमी केले.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातून मेंढपाळ वाचला; मात्र शेळीची केली शिकार

मंचर - मंचर शहराच्या पूर्वेला मुळेवाडी रस्त्यालगत शुक्रवारी (ता. २३) पहाटे नितीन महादेव थोरात (रा. मुळेवाडी-मंचर, ता. आंबेगाव) यांच्या गुरांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गायीला गंभीर जखमी केले. दुपारी दोन वाजता मेंढपाळ पोपट ढेकळे (वय-२५) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला पण त्याने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्याजवळ असलेल्या शेळीला बिबट्याने उचलून झाडीझुडपात नेले. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंचर शहराच्या सभोवती बिबट्याचा वावर वाढला आहे. एक महिन्यापूर्वी जुन्या चांडोली रस्त्यावर दुचाकीहून जात असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. १५ दिवसापूर्वी वनखात्याने पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात स्थलांतरित केले होते. पण अजूनही दोन ते तीन बिबट्यांचा वावर या परिसरात असल्याची माहिती माजी सरपंच बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले यांनी दिली.

दरम्यान बिबट्याने शुक्रवारी दुपारी मेंढपाळावर हल्ला केल्याची माहिती समजल्यानंतर मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ यांनी वनपाल संभाजीराव गायकवाड व वनरक्षक पूजा कांबळे यांच्यासह वनकर्मचारी व वनखात्याची व्हान घटनास्थळी पाठविली.

'मंचर-मुळेवाडी परिसरात लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला यांनी या भागात प्रवास करताना तसेच पहाटे मोर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. या भागात वन खात्यामार्फत गस्त सुरु केली जाईल. या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला जाईल.'

- संभाजीराव गायकवाड, वनपाल वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर