
मंचर (पुणे) : पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये गेली अडीच महिने स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे म्हणून काम करणारे डॉ. महेश गुडे व डॉ अलकनंदा रेड्डी- गुडे हे दांपत्य पुन्हा आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहेत. त्यांचे सोमवारी (ता. ८) पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. उत्स्फूर्तपणे झालेले स्वागत पाहून ते भारावून गेले होते. विशेष म्हणजे या दांपत्याचा जवळपास ५०० पोझिटिव्ह रुग्णांशी थेट संपर्क आला आहे.
या दांपत्याचे पुण्याहून मंचरला येत असताना अवसरी फाट्यावर कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उद्योजक अजय घुले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, डॉ. वर्षाराणी गाडे, डॉ. भूषण साळी, डॉ. गणेश पवार, डॉ. लीना थोरात, डॉ. दत्ता चासकर, डॉ. सुहास कहडणे, ज्ञानशक्ती विकास वाहिनी स्वयंसेवी संस्था मुख्य कार्यकारी अध्यक्ष गार्गी वळसे पाटील, डॉक्टर, परिचारिका यांनी डॉ. गुडे दाम्पत्यावर पुष्पवृष्टी केली. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या स्वागतामुळे डॉ. गुडे दाम्पत्य भारावून गेले होते. डॉ. गुडे म्हणाले, लग्नानंतर प्रथमच स्वागताचा सोहळा जीवनात अनुभवला. मंचरकरांनी दिलेले प्रेम, प्रोत्साहन मी कधीही विसरणार नाही.
नायडू हॉस्पिटलमधील कामाविषयी डॉ. अलकनंदा म्हणाल्या, पती महेश व माझा जवळपास ५०० पोझिटिव्ह रुग्णांशी थेट संपर्क आला. दाखल झालेल्या रुग्णांवर प्रचंड मानसिक दडपण व भीतीचे सावट होते. कोरोनाची लागण झाली म्हणजे आपले काही खरे नाही, असा विचार करणाऱ्या रुग्णांना प्रथम धीर देण्याचे काम केले. औषध उपचाराबरोबर समुपदेशन हा महत्वाचा भाग होता. सुरुवातीला २ ते ३ दिवस रुग्ण आमच्याबरोबर बोलताना देखील घाबरत होते. पण, त्यानंतर आमच्याबरोबर सवांद वाढत गेला. मोकळेपणाने संवाद सुरु झाला. यापूर्वी बरे होऊन घरी पाठविलेल्या व्यक्तींची माहिती दिल्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा व आधार मिळाला. परिणामतः त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली. नायडू हॉस्पिटलमध्ये पुणे जिल्यातील १३ डॉक्टर काम करत होते. एक चलेंजिंग जॉब स्वीकारून अनेक रुग्णांना बरे करण्यात यश आले. हा आनंदाचा क्षण आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
डॉ. महेश गुडे हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात सन 2002 पासून हे दाम्पत्य दाखल झाले आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालय डॉ. गुडे हे अस्थिरोग तज्ज्ञ व पत्नी कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत. या पूर्वी कॉलरा, स्वाइन फ्लू, मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग आदींचे नैसर्गिक मार्गक्रमण, त्यांवरील उपचार व नियंत्रण करणे याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्या कारणाने covid-19 नव्या आजारासंबंधी चीनमधून येणाऱ्या बातम्यांवर त्यांचे बारीक लक्ष होते. हा आजार आपल्यापर्यंत पोहोचला तर डॉक्टर म्हणून, परिस्थितीनुरूप पार पाडावयाच्या कामांची रूपरेखा त्यांनी तयार केली होती. पुण्यातील पाहिले रुग्ण दुबईतून मुंबई मार्गे पुण्यात आलेले एक वयस्कर दाम्पत्य व त्यांना घेऊन येणारा वाहनचालक, हे कोरोना पोझिटिव्ह आल्याने प्रशासनाने नायडू रुग्णालय covid 19 घोषित केले. त्यामुळे तेथे आणखी डॉक्टरांची आवश्यकता असल्याचे कळाले. त्यामुळे या दांपत्याने तेथे काम करण्याची तयारी दर्शविली. 10 मार्च रोजी डॉ. गुडे व त्यानंतर 21 मार्च रोजी पत्नी अलकनंदा या नायडू रुग्णालयात रुजू झाल्या.
गुडे दांपत्याने नायडू रुग्णालयात रुग्णांची प्रथम तपासणी करणे, प्रयोगशाळेत तपासणी होऊन पोझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना दाखल करणे, त्यांच्यावर मानाकानुसार व लक्षणानुसार उपचार करणे व बरे झाल्यावर घरी सोडणे, ही सर्व कामे केली आहेत. काम करत असताना स्वतःचा व इतरांचा जंतूसंसर्गापासून बचाव करण्यासाठी पीपीई कीट वापरणे आवश्यक, पण क्लेशदायक होते. अनेकदा चष्म्याच्या आतून धुके यायचे, काहीच दिसायचे नाही, मास्क काढता येत नसल्याने काही तासांनी गुदमरल्यासारखे व्हायचे, असे अनुभव या डॉक्टर दांपत्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.