
बारामतीतून निर्यात झालेला आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या व्हाईट हाऊसमध्ये
बारामती - गेल्या काही वर्षात बारामती सारख्या ग्रामीण भागातून फळांची निर्यात वेगाने होत आहे. आता तर बारामतीतून निर्यात झालेला आंबा थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या व्हाईट हाऊसमध्ये जाऊन पोहोचला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरवर या बाबत माहिती दिली आहे.
हापूस, केश, गोवा मानकुर या सारख्या जातीच्या आंब्याची पेटी व्हाईट हाऊसला पाठविण्यात आली आहे, सातासमुद्रापार फळे निर्यात होतात ही आनंदाची बाब असून त्या बद्दल निर्यातदार कंपनी असलेल्या रेनबो इंटरनॅशनल कंपनीचेही सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे.
अमेरिकेत वॉशिंग्टन येथे भारतीय आंबा प्रचार कार्यक्रमाअंतर्गत आंब्यांची पेटी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. कोविडनंतर जवळपास शंभर टन आंब्याची एकट्या अमेरिकेत निर्यात झाली आहे. निर्यात वाढली असली तर विमानाने आंबा पाठविणे महागल्याने आंब्याची किंमत दुपटीने वाढली आहे.
किंमतीचा काहीसा परिणाम खरेदीवर झाला असला तरी यंदा 250 टन आंब्याची अमेरिकेत निर्यातीचे उददीष्ट असल्याचे रेनबो कंपनीने स्पष्ट केले आहे.
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य पणन मंडळाने उभारलेल्या केंद्रातून निर्यात सुरु आहे. यावर्षी अमेरिका, इस्राईल, कॅनडा सह 31 देशांत आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील हिमायत आणि बैगनपल्ली या आंब्याच्या जातींसह महाराष्ट्रातील केशर, हापूस, मानकूर हे पाच आंब्याचा त्यात समावेश आहे. पाच एकरांहून अधिक आंबा क्षेत्र असणारे शेतकरी त्यांच्या बागेतील आंबा निर्यात करु शकतात.
Web Title: Mango Exported From Baramati To The Us President Joe Biden White House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..