esakal | बाजार समितीकडून आंब्याची तपासणी; अडत्यांकडून 399 बॉक्स जप्त

बोलून बातमी शोधा

बाजार समितीकडून आंब्याची तपासणी; अडत्यांकडून 399 बॉक्स जप्त
बाजार समितीकडून आंब्याची तपासणी; अडत्यांकडून 399 बॉक्स जप्त
sakal_logo
By
प्रवीण डोके @pravindoke007

पुणे : दरवर्षीच आंब्याच्या हंगामात कर्नाटकचा आंबा रत्नागिरी हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जातो. फरक लक्षात न आल्याने ग्राहक रत्नागिरी हापूसच्या दरात कर्नाटकचा हापूस खरेदी करीत असतात. या प्रकारामुळे ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने आंब्याची तपासणी मोहिम सुरू केली आहे. मंगळवारी फळ विभागातील तीन आडत्यांकडून 399 बॉक्स प्रशासनाने ताब्यात घेतले तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

गेट नं. ७ येथील आंबा बाजारासाठी उभारण्यात आलेल्या शेड मध्ये कारवाईत नॅशनल फ्रुट कंपनी या गाळ्यावरून दोन डझनाचे 187 बॉक्स व एक डझनाचे 77 बॉक्स रूक्कमुद्दिन राजेभाई शेख या गाळ्यावरून दोन झडनाचे 53 आणि आबासाहेब काकासाहेब जगताप या गाळ्यावरून दोन डझनाचे 82 बॉक्स जप्त करण्यात आले. रत्नागिरी तसेच देवगड हापूस लिहिलेल्या बॉक्समध्ये कर्नाटकच्या आंब्याची विक्री केली जात होती. त्यामुळे हे आंब्याचे बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या 399 बॉक्समध्ये 322 बॉक्स दोन डझनाचे आहेत. तर 77 बॉक्स हे एक डझनाचे आहेत.

हेही वाचा: निलंबित फौजदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

चुकीच्या पद्धतीने आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या अडत्यावर माल जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात आली. या आडत्यांकडून 11 हजार 800 रूपयांच्या पावत्या करण्यात आल्या. तसेच 35 हजार 400 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले आंब्याचे बॉक्स बाजार समितीकडून लीलाव पद्धतीने विकण्यात आले. पाच खरेदीदारांनी बोली लावली होती. त्यातील एका खरेदीदारांनी 80 हजार 950 रुपयांत आंब्याची खरेदी केली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी ही कारवाई केली.

...तर गुन्हे दाखल करणार

''आंबा खरेदी करणार्‍या ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अशी कारवाई सातत्याने सुरू असणार आहे. तसेच कारवाई झालेल्या आडत्यांनी पुन्हा तसाच प्रकार केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.''

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती.

हेही वाचा: निलंबित फौजदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल