

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ८ : घराजवळील धाब्यावरील आरडाओरड आणि गोंधळाबाबत तक्रार केल्याच्या रागातून झालेल्या मारहाणीत मणिपूरचे संगीतकार आणि प्रसिद्ध गिटारवादक चोंगथाम विक्रम सिंह (वय ५४) यांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद ईशान्य भारतासह दिल्लीतील मणिपुरी समुदायात आज उमटले आहेत.
दिल्लीतील आश्रम परिसरातील किलोकरी गावात ही घटना काल घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सात जणांना अटक केली आहे तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिंह यांच्या घरासमोर डिलिव्हरी बॉय आणि ढाब्यातील कर्मचाऱ्यांच्या आरडाओरड आणि गोंधळ सुरू होता. सिंह यांनी त्याबाबत तक्रार केली. त्यानंतर ते घराबाहेर आले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यात गंभीर जखमी झालेल्या सिंह यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिंह हे मणिपूरच्या संगीत क्षेत्रातील परिचित नाव होते. त्यांनी ‘फिनिक्स’, ‘अल्ट्रा व्हायर्स’ आणि ‘ईस्टर्न डार्क’ यांसारख्या बँडसोबत काम केले होते. दिल्लीमध्ये ते संगीत शिक्षक म्हणूनही कार्यरत होते.
राहुल गांधींचा केंद्रावर सवाल
विक्रम सिंह यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘ईशान्य भारतातील नागरिक दिल्लीमध्ये सुरक्षित आहेत का?’ असा सवाल त्यांनी केला आहे. ‘‘ गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिस वाढत्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला, विशेषतः ईशान्येकडील नागरिकांविरुद्धच्या घटनांना रोखण्यासाठी काय करत आहेत,’’ अशी विचारणाही त्यांनी केली.
सन्मानाने जगण्याचा अधिकार
‘आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आम्हाला न्याय हवा आहे,’ अशी मागणी विक्रम सिंह यांच्या नातेवाइकांनी केली. मणिपूरचे खासदार बिमोल अकोइजम यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ‘‘ईशान्य भारतातील असो किंवा देशाच्या अन्य भागातील, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे,’’ असे ते म्हणाले.
‘अभाविप’कडून निषेध
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही (अभाविप) या घटनेचा निषेध केला. “ विक्रम सिंह यांच्या क्रूर हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. कोणतेही मतभेद अशा हिंसाचाराचे समर्थन करू शकत नाहीत,” असे ‘अभाविप’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
विक्रम सिंह यांचे संगीत आणि मणिपूरच्या सांस्कृतिक जीवनातील त्यांच्या योगदान कायम स्मरणात राहिल.
खेमचंद युमनाम, मुख्यमंत्री, मणिपूर
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.