बारामतीतील कंपन्या 46 दिवसांनंतर उघडल्या पण... 

मिलिंद संगई
Tuesday, 5 May 2020

थेट उत्पादन कोणीही सुरू केलेले नसले, तरी स्वच्छता व उत्पादनाच्या तयारीस अनेकांनी सुरवात केली.

बारामती (पुणे) : बारामती "एमआयडीसी'तील अनेक कंपन्यांनी आजपासून आपले दैनंदिन कामकाज करण्यास प्रारंभ केला. थेट उत्पादन कोणीही सुरू केलेले नसले, तरी स्वच्छता व उत्पादनाच्या तयारीस अनेकांनी सुरवात केली. जवळपास 46 दिवसांच्या कालखंडानंतर आज कंपन्यांचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे उद्योजकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 

बारामती "एमआयडीसी'तील 150 हून अधिक कंपन्यांना थेट ऑनलाइन परवानगी मिळाली असून, 80 कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना पासेस प्रदान करण्यात आले आहेत. या कंपन्यांचे कामकाज लगेचच सुरू होण्याची शक्‍यता कमी असली, तरी किमान काही प्रमाणात कंपन्यांची स्वच्छता व इतर तयारीची कामे आजपासून सुरू करण्यात आली. 

बारामतीच्या वीज पुरवठ्याबाबत घेतलाय हा निर्णय 

दरम्यान, 30 टक्के मनुष्यबळ वापरणे, मास्क व सॅनेटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन आज पहिल्या दिवशी सर्वांनीच केले. काही मोठ्या कंपन्यांनी उत्पादनाची वेगाने तयारी केलेली असून, लवकरच त्यांचे उत्पादनही सुरू होईल. काही कंपन्यांना मात्र कर्मचारी समस्या भेडसावणार, अशी चिन्हे आहेत. मात्र, सर्व सुरळीत होईपर्यंत नेमकी स्थिती समोर येणे अवघड असल्याचे सांगितले गेले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती एमआयडीसीमध्ये लहान मोठे मिळून जवळपास 390 उद्योग आहेत, हे सर्व उद्योग वेगाने सुरू व्हावेत, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून, आज पोलिसांनीही चांगले सहकार्य केल्याची माहिती बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे व कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी दिली. 

उद्योजकांनी नियमांचे पालन करीत कारखाने सुरू करण्यावर भर दिला असून, सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. 
- धनंजय जामदार, अध्यक्ष, 
इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many companies in Baramati "MIDC" started their day to day operations from today